
रणवीर चव्हाण, शर्विल शेवाळे चमकले
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ लीग क्रिकेट स्पर्धेत विलास संघाने जालना संघाचा एक डाव आणि १९४ धावांनी पराभव केला.
विराग क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात विलास संघाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ७६ षटकात आठ बाद ३३० धावांवर डाव घोषित केला. जालना संघाचा पहिला डाव २६.१ षटकात अवघ्या ७० धावांत संपुष्टात आला. विलास संघाने जालना संघावर फॉलोऑन लादला. फॉलोऑन दिल्यानंतर जालना संघ दुसऱया डावात १९.४ षटकात ६६ धावांत गारद झाला. विलास संघाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर हा सामना एक डाव आणि १९४ धावांनी जिंकला.
या सामन्यात रणवीर चव्हाण याने १९४ चेंडूत १५५ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने आपल्या शतकी खेळीत २७ चौकार मारले. ऋषभ गायकवाड याने दहा चौकारांसह ५८ धावा फटकावल्या. शर्विल देशमुख याने ३१ धावांचे योगदान दिले. त्याने पाच चौकार मारले.
गोलंदाजीत शर्विल शेवाळे याने ५ षटके गोलंदाजी करत अवघ्या २ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. त्याने चार षटके निर्धाव टाकली हे विशेष. ओम खुटाळे याने ११ धावांत चार बळी घेतले. शर्विल शेवाळे याने १६ धावांत चार बळी घेतले. शर्विल याने सामन्यात नऊ विकेट घेण्याचा पराक्रम केला.