
ब्रेव्हिस, दुबे, नूरची चमकदार कामगिरी
कोलकाता : डेवॉल्ड ब्रेव्हिस (५२), शिवम दुबे (४५) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने सलग चार पराभवानंतर विजय नोंदवला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील चेन्नईचा हा फक्त तिसरा विजय आहे. चेन्नईने गतविजेत्या केकेआर संघाचा चुरशीच्या लढतीत दोन विकेट राखून पराभव केला. केकेआर संघाचा हा सहावा पराभव ठरला.
चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई संघाचा डाव गडगडला. चेन्नईची डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. आयुष म्हात्रे (०), डेव्हॉन कॉन्वे (०), आर अश्विन (८) हे फलंदाज झटपट बाद झाले. उर्विल पटेल याने ११ चेंडूत ३१ धावा फटकावत सामन्यात रंगत आणली. त्याने चार उत्तुंग षटकार व एक चौकार मारला. अष्टपैलू रवींद्र जडेजा १९ धावांवर बाद झाला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला.
डेवॉल्ड ब्रेव्हिस व शिवम दुबे यांच्यावर मोठी भिस्त होती. या जोडीने ६७ धावांची वेगवान भागीदारी केली. यात ब्रेव्हिसच्या वादळी फलंदाजीचा मोठा वाटा होता. त्याने अवघ्या २५ चेंडूत ५२ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी साकारली. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. त्यानंतर शिवम दुबे याने ४० चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी केली. दुबेने तीन टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. दुबे उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. रिंकू सिंग याने त्याचा सुरेख झेल टिपून मोठा अडसर दूर केला. वैभव अरोराचा हा डावातील दुसरा बळी ठरला.
वैभवने तिसरा बळी टिपताना नूर अहमदला (२) बाद केले. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ८ धावांची गरज होती आणि स्ट्राईकला कर्णधार धोनी होता. धोनीने पहिल्याच चेंडूवर रसेल याला उत्तुंग षटकार ठोकत मैदान दणाणून सोडले. धोनी (नाबाद १७), अंशुल कंबोज (नाबाद ४) यांनी संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. चेन्नईने १९.४ षटकात आठ बाद १८३ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला. वैभव अरोरा (३-४८), हर्षित राणा (२-४३) व वरुण चक्रवर्ती (२-१८) यांनी शानदार कामगिरी व्यर्थ ठरली.
अजिंक्य रहाणेची दमदार फलंदाजी
तत्पूर्वी, गतविजेत्या केकेआर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि केकेआर संघाने २० षटकात सहा बाद १७९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. दुसऱ्याच षटकात गुरबाज (११) बाद झाला. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. सुनील नरेन व कर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने ५८ धावांची भागीदारी करत डाव सावरला.सुनील नरेन याने १७ चेंडूत २६ धावांचे योगदान दिले. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. अंगकृष रघुवंशी (१) लवकर बाद झाला.
एका बाजूने विकेट पडत असताना अजिंक्य रहाणे याने ३३ चेंडूत ३८ धावा फटकावत डावाला आकार दिला. रहाणे याने ४ चौकार व २ षटकार मारले. रहाणे मोठी खेळी खेळेल असे वाटत असताना जडेजा याने त्याला बाद करुन मोठा अडथळा दूर केला. रहाणेचे अर्धशतक केवळ २ धावांनी हुकले. त्यानंतर मनीष पांडे व आंद्रे रसेल यांनी शानदार फलंदाजी केली. पांडेने २८ चेंडूत नाबाद ३६ धावा फटकावल्या. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. रसेल याने २१ चेंडूत ३८ धावांची जलद खेळी साकारली. त्याने तीन टोलेजंग षटकार व चार चौकार मारले. रिंकू सिंग (९) याचा सीमारेषेवर आयुष म्हात्रे याने उत्कृष्ट झेल पकडला. रमणदीप सिंग ४ धावांवर नाबाद राहिला. केकेआर संघाने २० षटकात सहा बाद १७९ धावसंख्या उभारुन सामन्यावर आपली पकड घट्ट केली.
चेन्नई संघाकडून नूर अहमद हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. नूर याने ३१ धावांत चार विकेट घेतल्या. अंशुल कंबोज (१-३८), रवींद्र जडेजा (१-३४) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.