
नवी दिल्ली : महाराष्ट्राला सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत मंगळवारी दोन पदके जिंकून देणार्या आकांक्षा म्हेत्रेने बुधवारी सायकलिंग स्पर्धेत मुलींच्या स्प्रींट शर्यतीत सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. याचबरोबर मुलांच्या स्प्रिंट प्रकारात सिद्धेश घोरपडेला रौप्यपदक मिळाले. सिद्धेशने मंगळवारी महाराष्ट्राला सायकलिंग मधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.
राजधानी नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सलग दुसर्या दिवशी महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. मुलींच्या २०० मीटर्स स्प्रींट शर्यतीत आकांक्षा म्हेत्रेने सुवर्णपदक जिंकले, तर केरळची अनाक्षीया थॉमस रौप्य पदकाची मानकरी ठरली. झारखंडच्या सबिना कुमारी हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या ३ हजार मीटर्स इंडिव्हिजल पुरसुईट सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने ३ मिनिटे ३७.७७८ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. राजस्थानच्या सिताराम बेनिवलने ३ मिनिटे ३६.६०७ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.