< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचा रिलेमध्ये सुवर्ण धमाका – Sport Splus

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचा रिलेमध्ये सुवर्ण धमाका

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 72 Views
Spread the love

चार पदकांची कमाई

गया : महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सलग तिसर्‍या दिवशी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राने मुलांच्या ४ बाय मेडले रिले स्पर्धेत सुवर्णपदकाचा धमाका केला. याचबरोबर धरीती अहिरवालने रौप्य, तर वेदांत तांदळे व अलेफिया धनसुरा यांनी कांस्यपदक पटकावले.

गया शहरातील ‘बीआयपीएआरडी’च्या जलतरणात तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अर्णव कडू, शुभम जोशी, वेदांत तांदळे व अथर्व संकपाळ या चौकडीने मुलांच्या ४ बाय मेडले रिले स्पर्धेत ३ मिनिटे ५७.८९ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या संघाने ३ मिनिटे ५९.०५ सेंकद वेळेसह रौप्य, तर आंध्र प्रदेशच्या संघाने ४ मिनिटे ०२.५८ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

मुलींच्या ४०० मीटर मेडले प्रकारात महाराष्ट्राच्या धरिती अहिरवाल हिने ४ मिनिटे २०.६० सेंकद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. तामिळनाडूच्या श्रीनिथी नटेसन हिने ५ मिनिटे १७.५७ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली, तर तेलंगणाची श्री निथया सागी ५ मिनिटे २०.८१ सेंकद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. याचबरोबर मुलींच्या १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अलेफिया धनसुरा हिने ५९.७४ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले. कर्नाटकची रुजुला एस हिने ५९.२९ सेंकद वेळेसह सुवर्ण, तर दिल्लीच्या तितिक्षा रावलने ५९.४८ सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले.

मुलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राच्या वेदांत तांदळेला ५६.२९ सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले. आसामचा जानंजॉय हझरिका ५५.५२ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर कर्नाटकच्या चिंतन शेट्टीला ५६.१४ सेंकद वेळेसह रौप्यपदक मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *