
नाशिक ः नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनची तलवारबाजीची खेळाडू मिताली सचिन परदेशी हिची बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा ११ ते १५ मे दरम्यान बिहार राज्याची राजधानी पटणा येथे होणार आहे.
मिताली ही तलवारबाजीच्या ईप्पी या प्रकारात सहभागी होणार आहे. मिताली ही गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षक प्रसाद परदेशी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. याआधी झालेल्या राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये मितालीने उत्तम कामगिरी करून पदके मिळवली आहेत. त्यामुळे या स्पर्धेतही ती असाच खेळ करून पदके मिळवेल असा विश्वास प्रशिक्षक प्रसाद परदेशी यांनी व्यक्त केला. मितालीच्या या निवडीबद्दल क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, मनोज म्हस्के यांनी स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.