
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः अर्शान पठाण सामनावीर
छत्रपती संभाजीनगर – प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत सीके स्पोर्ट्स संघाने पीसीए९९ क संघावर सात विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात अर्शान पठाण याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात पीसीए९९ क संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २५ षटकात नऊ बाद १३७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना सीके स्पोर्ट्स संघाने १७.२ षटकात तीन बाद १४१ धावा फटकावत सात विकेट राखून सामना सहजपणे जिंकला.

या सामन्यात अर्शान पठाण याने २९ चेंडूत ३८ धावांची जलद खेळी केली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. आर्यन जाधव याने २५ चेंडूत २९ धावा फटकावल्या. त्याने दोन चौकार व दोन षटकार ठोकले. समर्थ मांगदरे याने २३ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. त्याने पाच चौकार मारले.
गोलंदाजीत अभिषेक कुचेकर याने २४ धावातं दोन गडी बाद केले. हुजेफा पठाण याने १४ धावांत एक बळी घेतला. समर्थ मांगदरे याने १५ धावांत एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक
पीसीए९९ क टीम ः २५ षटकात नऊ बाद १३७ (अर्णव जोशी २२, अर्जुन वडगावकर ७, कारक भारद्वाज १२, आर्यन जाधव २९, अतिश शिंदे नाबाद १६, अंगराज सिंग २०, इतर २८, अभिषेक कुचेकर २-२४, अर्शान पठाण १-१७, समर्थ मांगदरे १-१५, मनोज दरक १-१२) पराभूत विरुद्ध सीके स्पोर्ट्स टीम ः १७.२ षटकात तीन बाद १४१ (कृतार्थ पाडळकर १०, श्रेयस कुलकर्णी १९, परी सोनार १६, अर्शान पठाण नाबाद २८, समर्थ मांगदरे नाबाद २३, इतर ३५, शौर्य राजपूत १-३३, हुजेफा पठाण १-१४, आर्यन जाधव १-२३). सामनावीर ः अर्शान पठाण.