दोरीच्या मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचा दुहेरी धमाका

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

आर्या साळुंखेला सुवर्ण, तर तनश्री जाधवला रौप्य

गया : आर्या साळुंखे आणि तनश्री जाधव या महाराष्ट्रीयन खेळाडूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मल्लखांब या देशी खेळातील दोरीच्या मल्लखांबमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदके जिंकून दुहेरी धमाका केली. स्‍पर्धेत आर्याने १ सुवर्ण, २ रौप्‍यांसह पदकाचह हॅटट्रिक तर तनश्रीने ३ रौप्‍य, १ कांस्य पदकासह पदकांचा चौकार झळकविला.

मुलींच्या विभागातील दोरीच्या मल्लखांब प्रकारात आर्या साळुंखे आणि तनश्री जाधव मराठमोळ्या सहकाऱ्यांमध्येच सुवर्णपदकासाठी रस्सीखेच रंगली होती. यात अखेर साताऱ्याच्या आर्या साळुंखेने ८.७० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तनश्रीला ८.६५ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुदुचेरीच्या ओविया राजा हिने ८.५० गुणांसह कांस्यपदक जिंकले. 

आर्या साळुंखेची ही दुसरी खेलो इंडिया स्पर्धा होय. ती मोहिते सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराजा सयाजीराव व्यायामशाळेत मल्लखाबांचा सराव करते. तनश्री जाधव हिची ही दुसरी खेलो इंडिया स्पर्धा होय. २०२२च्या मध्यप्रदेश मधील खेलो इंडिया स्पर्धेत तिने एक सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकली होती. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या १० दिवसीय शिबिराचा आम्हाला चांगला फायदा झाला, असे तनश्री आवर्जून सांगते. गणेश देऊळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती श्री पार्लेश्वर व्यायामशाळा येथे मल्लखांबाचे धडे गिरवत आहे. 

महाराष्ट्राच्या तनश्री जाधव हिने पुरलेला मल्लखांब प्रकारातही महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. मध्य प्रदेशच्या सिद्धी गुप्ताने ८.४५ गुणांसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. ८.४० गुणांची कमाई केलेल्या तनश्रीला सुवर्णदपकाने हुलकावणी दिली. छत्तीसगढच्या दुर्गेश्वरी कुमेती हिने ८.३५ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *