
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट – वरद सुलतान सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने एएसएफ संघाचा तब्बल १०६ धावांनी पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात वरद सुलतान याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २५ षटकात सात बाद २०५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एएसएफ संघ २५ षटकात नऊ बाद ९९ धावा काढू शकला. प्रदीप स्पोर्ट्स संघाने तब्बल १०६ धावांनी सामना जिंकून आगेकूच केली.

या लढतीत वरद सुलतान याने ५६ चेंडूत ६५ धावांची दणदणीत अर्धशतकी खेळी केली. वरद याने या अर्धशतकात १० चौकार व २ षटकार ठोकले. रुद्राक्ष कार्ले याने २३ चेंडूत ४७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने ४ चौकार व ४ षटकार मारले. झैद खान याने ५९ चेंडूत ४४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत श्लोक राठोड याने ११ धावांत दोन गडी बाद केले. सुमेध कांबळे याने १६ धावांत दोन बळी टिपले. नूर सय्यद याने २९ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
प्रदीप स्पोर्ट्स ः २५ षटकात सात बाद २०५ (वरद सुलतान ६५, आयुष भेंडणेकर १४, रुद्राक्ष कार्ले ४७, श्लोक राठोड १७, सत्यजीत नाबाद २७, आर्यन शिंदे ८, इतर २४, नूर सय्यद २-२९, आदित्य आढाव १-३२, झैद खान १-३७, शेख अबुबाकर १-३०, कार्तिक गेहलोत १-३०) विजयी विरुद्ध एएसएफ टीम ः २५ षटकात नऊ बाद ९९ ( झैद खान नाबाद ४४, श्लोक देशमुख १३, इतर १७, सुमेध कांबळे २-१६, मयूर सोमासे २-३२, श्लोक राठोड २-११, यशराज उगले १-१७, श्रेणिक काळे १-१०). सामनावीर ः वरद सुलतान.