
जिल्हास्तरीय युवा कबड्डी चषक स्पर्धा भांडुपमध्ये रंगली
मुंबई : युवासेना कार्यकारिणी सदस्या राजोलताई संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि युवा सेना सहसचिव अजय जठार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या युवासेना जिल्हास्तरीय युवा कबड्डी चषक २०२५ स्पर्धेने भांडुपमध्ये चांगलाच जल्लोष निर्माण केला. या स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष गटात मुलुंड क्रीडा केंद्र, मुलुंड तर द्वितीय श्रेणी गटात सिद्धार्थ क्रीडा मंडळ यांनी विजेतेपदावर मोहोर उमटवली.
प्रथम श्रेणीच्या अंतिम लढतीत मुलुंड क्रीडा केंद्राने लालबत्ती क्रीडा मंडळ, विक्रोळी यांना ३२-९ अशा मोठ्या फरकाने हरवत विजेतेपद पटकावले. रोहित राठोडचा अष्टपैलू खेळ पाहण्यासारखा ठरला, तर विरोधी संघाकडून शुभम सरोजने एकाकी झुंज दिली.
द्वितीय श्रेणी गटात सिद्धार्थ क्रीडा मंडळाने आई वरदायनी देवी पंदेरीकर संघावर ४२-३० गुणांनी मात करत आपली ताकद दाखवून दिली. संकेत यादव आणि ओमकार आहिरे यांच्या अचूक चढाया आणि पकडी निर्णायक ठरल्या.
या स्पर्धेच्या आयोजनात भारत माता संघाचे प्रशिक्षक शैलेश जागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रमुख उपस्थितीमध्ये माजी आमदार रमेशभाई कोरगावकर, राजोल संजय पाटील, निशिकांत शिंदे, गणेश मुळे पाटील, वासुदेव मचेकर आणि राजेंद्र मोकल यांचा समावेश होता. संकेत भेगडे, सुनील डिसूजा, सागर सोनकांबळे, ओमकार मोकाशी, अक्षय दिघे यांनी आयोजक व निमंत्रक म्हणून अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्पर्धा घडवली.
विशेष पुरस्कार
प्रथम श्रेणी गट : सर्वोत्कृष्ट खेळाडू: रोहित राठोड (मुलुंड क्रीडा केंद्र)
उत्कृष्ट चढाईपटू : शुभम सरोज (लालबत्ती क्रीडा मंडळ)
द्वितीय श्रेणी गट : सर्वोत्कृष्ट खेळाडू: ओमकार आहिरे (सिद्धार्थ क्रीडा मंडळ)
उत्कृष्ट चढाईपटू : प्रथमेश महाडिक (आई वरदायनी देवी पंदेरीकर संघ)