
संस्कार जोशीची अर्धशतकी खेळी, यश अमोंडीकरची घातक मारा आणि ७४ धावांनी दणदणीत विजय
मुंबई ः खेळात नाट्य, जिद्द आणि प्रतिभा यांचे सुरेख मिश्रण घडवणाऱ्या प्रो ए एस छागला इंटर मेडिकल क्रिकेट स्पर्धेच्या दहाव्या पर्वात एचबीटीएमसी-कुपर हॉस्पिटलने धमाकेदार कामगिरी करत आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. ग्रँट मेडिकल कॉलेजच्या १८० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कुपर हॉस्पिटलने जीएमसी-जेजे हॉस्पिटलचा तब्बल ७४ धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
बॉम्बे जिमखानाच्या ऐतिहासिक मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कुपर संघाने ४४.५ षटकांत २३६ धावा फटकावल्या. या विजयात चमकदार फलंदाजीत संस्कार जोशीने ५७ चेंडूत ५४ धावा करून बाजी मारली, तर गौरव खवसेने (४७), सिद्धांत वाणीने (३०), पंकज नावकरने (२५) आणि श्रेयस जगतापने नाबाद (२४) धावा करत संघाला भक्कम स्कोअरकडे नेले.
जेजे हॉस्पिटलकडून आशुतोष परमार, कैफ सय्यद आणि महेश पाटील यांनी प्रत्येकी २-३ बळी घेतले. मात्र, कुपरच्या फळीवर फारसा परिणाम होऊ शकला नाही.
प्रत्युत्तरात जेजे हॉस्पिटल संघानेही दमदार सुरुवात केली. रोहित रोंगे, प्रीयांषु वर्मा आणि आदेश निकम यांच्या फटकेबाजीत २५ व्या षटकातच १३४ धावांपर्यंत मजल मारली होती. पण सामना एका क्षणात बदलला आणि तो क्षण निर्माण केला कुपरच्या यश अमोंडीकरने. यशने अवघ्या ११ धावांत ५ बळी घेत जेजे संघाच्या डावाला खिंडार पाडले. त्याला वैभव सावरकर व सिद्धांत वाणी यांची उत्तम साथ लाभली आणि अखेर जेजेचा डाव ३३.३ षटकांत १६२ धावांवर आटोपला. सामनावीर पुरस्कार यश अमोंडीकर याला तर स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार संस्कार जोशीला देण्यात आला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा क्रिकेट विश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर, एमसीए सेक्रेटरी अभय हडप, बॉम्बे जिमखान्याचे सरण खान आणि खुद्द प्रो छागला यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक केले.
या स्पर्धेत गव्हरमेंट डेंटल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल हे उपविजेते, तर सायन, नायर, डी वाय पाटील व राजीव गांधी मेडिकल कॉलेज हे संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून स्पर्धेला रंगत आणणारे ठरले. स्पर्धेला मुंबई क्रिकेट असोसिएशन, बॉम्बे जिमखाना आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांचे सहकार्य लाभले.