
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धा सोमवारपासून
मुंबई : क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एम एल डहानुकर कॉमर्स कॉलेज (स्वायत्त) च्या चार तेजस्वी विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा महाविद्यालयाचा झेंडा अभिमानाने फडकावला आहे. पार्ले टिळक विद्यालय संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रतिष्ठित संस्थेच्या खेळाडूंची निवड मुंबई विद्यापीठाच्या महिला बेसबॉल संघात करण्यात आली असून, त्या १२ ते १६ मे २०२५ दरम्यान पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी तनया चौधरी, वेदांगी चाफे, मानसी कारेकर आणि श्रावणी पवार या चार खेळाडूंची निवड झाली आहे. या चारही खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आणि अथक मेहनतीने विविध स्पर्धांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीचा परिणाम म्हणून त्यांची राष्ट्रीय स्तरावरील निवड झाली आहे. ही निवड महाविद्यालयासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानास्पद बाब ठरली आहे.
डहानुकर कॉलेजच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले असून, महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवर्ग व क्रीडा विभागाने सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या चार रणरागिणी मैदानावर आपला झेंडा रोवतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.