
मुंबई, : गणेश मकुटेच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर एसबीआय स्पोर्ट्स क्लबने थॉमस कुकचा ३२ धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली, तर दुसऱ्या सामन्यात सिटीबँकेने येस बँकेवर ८५ धावांनी मोठा विजय मिळवला.
बंगाल स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात गणेश मकुटेने केवळ ३७ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह ७१ धावा ठोकत एसबीआयला मजबूत भक्कम सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीच्या जोरावर संघाने १९.५ षटकांत १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात थॉमस कुक संघ २० षटकांत ११० धावांवर गारद झाला. गौतम यादवने ४-१४ अशी प्रभावी कामगिरी करत सामन्याचे पारडे एसबीआय संघाकडे झुकवले.
शिवाजी पार्क जिमखाना मैदानावरील दुसऱ्या सामन्यात सिटीबँकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. सागर चेंबूरकर (४५) आणि राहुल सोनी (४१) यांनी धावांची भक्कम भर घातली. येस बँकचा डाव १८.३ षटकांत केवळ ८० धावांवर आटोपला. सिटीबँकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत सामना पूर्णपणे गाजवला. विनायक पिल्लई व शशांक शेट्टी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.