
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट – आरोही आहेर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर – प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने सीके स्पोर्ट्स संघावर अटीतटीच्या लढतीत १३ धावांनी रोमांचक विजय साकारला व आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात आरोही आहेर हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत २५ षटकात आठ बाद १५४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात सीके स्पोर्ट्स संघाने २४.१ षटकात सर्वबाद १४१ धावा काढल्या. प्रदीप स्पोर्ट्स संघाने १३ धावांनी चुरसीचा सामना जिंकला.

या सामन्यात वरद सुलतान याने ६२ चेंडूत ६७ धावांची जलद खेळी केली. वरदने १० चौकारांसह अर्धशतक साजरे केले. श्रेयस कुलकर्णी याने ३८ चेंडूत ५४ धावा फटकावल्या. आक्रमक अर्धशतक ठोकताना त्याने १० चौकार मारले. आर्यन शिंदे याने २७ चेंडूत २८ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने दोन चौकार व दोन षटकार ठोकले.
गोलंदाजीत अर्शान पठाण याने १८ धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. आरोही आहेर हिने ३० धावांत तीन गडी बाद करुन चमकदार कामगिरी नोंदवली. आर्यन शिंदे याने ९ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
प्रदीप स्पोर्ट्स ः २५ षटकात आठ बाद १५४ (वरद सुलतान ६७, आरोही आहेर ६, सत्यजीत ५, प्रेम भालेराव ६, आर्यन शिंदे नाबाद २८, इतर ३८, अर्शान पठाण ४-१८, अभिषेक कुचेकर १-४२, समर्थ मांगदरे १-१८, मनोज दरक १-२३) विजयी विरुद्ध सीके स्पोर्ट्स ः २४.१ षटकात सर्वबाद १४१ (अर्शान पठाण २२, समर्थ मांगदरे २४, श्रेयस कुलकर्णी ५४, मनोज दरक ११, शिवेन अग्रवाल ६, इतर १९, आरोही आहेर ३-३०, सुमेध कांबळे २-२९, आर्यन शिंदे २-९, श्रेणिक काळे १-२४, पवन रोडे १-१९, मयूर सोमासे १-२२). सामनावीर ः आरोही आहेर.