
शिबिराचे यंदाचे ५१वे पर्व
दादर, मुंबई ः शताब्दी वर्षात पदार्पण करत असलेल्या समर्थ व्यायाम मंदिराने आपल्या अखंड परंपरेला साजेसा उत्साह आणि शिस्तबद्धतेचा वारसा पुढे चालवत यंदाच्या वासंतिक शिबिराचे यशस्वी ५१ वे वर्ष साजरे केले आहे. सन १९७५ मध्ये सुरू झालेल्या या शिबिराला आज एक गौरवशाली आणि प्रेरणादायी इतिहास लाभलेला आहे.
या संपूर्ण कालखंडात, शिबिराची अखंड जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडणारे व पद्मश्री पुरस्काराने गौरविले गेलेले उदय विश्वनाथ देशपांडे हे नाव आता केवळ एक प्रशिक्षक म्हणून नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील ध्येयवेड्या समाजसेवकाचे प्रतीक बनले आहे. विशेषतः लहानग्या खेळाडूंना व्यायाम, शिस्त आणि खेळामार्फत आयुष्य घडवणारे हे शिबिर आज हजारो पालकांचा विश्वासाचे प्रेरणास्थान ठरले आहे.
‘समर्थ’चे अॅथलेटिक्स प्रशिक्षक सुनील सवने हे यंदाचे शिबीर प्रमुख असून कार्योपाध्यक्ष स्वप्निल राणे हे प्रवेश यंत्रणा प्रमुख आहेत. सहसचिव डॉ. नीता ताटके व राष्ट्रीय ॲथलीट ख्याती धुरू यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रीय हॉकीपटू प्रियांका शेट्टी या ध्वजारोहण अतिथी प्रमुख आहेत. ‘समर्थ’मधील सर्वच ज्येष्ठ खेळाडू व पालक यांनी संगणकीय कामांपासून शिबिरार्थींची रोज हजेरी लावणं, मुलांना खाऊ देणं या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडल्या. यामुळेच हे शिबीर ‘समर्थ’पणे पार पडले आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या परिसरात, दररोज सकाळ-संध्याकाळ विविध खेळांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण सुरू असते. मंदिराच्या अध्यात्मिक आणि व्यायामाच्या अनुशासनाने भारलेल्या या परिसरात मल्लखांब, जुडो, खोखो, अॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळांवर विशेष भर दिला जातो.
आजवर येथे घडलेले असंख्य खेळाडू केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली चमक दाखवत आहेत. मल्लखांब या पारंपरिक भारतीय खेळाचे आधुनिकतेशी समरसणारे रूप येथे अनुभवायला मिळते आणि हेच श्री समर्थ व्यायाम मंदिराचे वैशिष्ट्य ठरते.
उदय देशपांडे सांगतात की, “प्रत्येकाने आपल्या शरीराची निगा घेतली पाहिजे. बाजारातून वस्तू विकत घेताना आपण त्याचा वापर कसा करावा याचे माहितीपत्रक वाचतो, त्याची काळजी कशी घ्यावी? त्या वस्तूचे आयुर्मान कसे वाढेल याची काळजी घेतो. पण आपण या भूतलावर जन्म घेतांना हे जे शरीररूपी यंत्र देव आपल्याला देतो, त्यासोबत आपल्याला कोणतेही माहितीपत्रक मिळत नाही. त्यामुळे त्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो. शरीरासारख्या अनमोल देणगीकडे लक्ष देत नाही. परंतु आपण व्यायाम, योगा यांची साथ घेतली, तर आपण औषधांपासून दूर राहून उत्तम दीर्घायुष्य आयुष्य जगू शकतो.”
शताब्दी वर्षानिमित्त संस्थेने मल्लखांब या भारतीय खेळाचा जागर उभारण्याचा संकल्प केला असून, विविध शहरांमध्ये प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि प्रचारात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचा उद्देश केवळ खेळाचा प्रसार नव्हे, तर नवीन पिढीला या शारीरिक, मानसिक आणि नैतिक दृष्टिकोनातून समृद्ध करणाऱ्या खेळाकडे वळवणे हा आहे.