कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राची तीन पदके निश्चित

  • By admin
  • May 12, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love
  • प्रणव घारे, सुरज चोरगे, परम माळी अंतिम फेरीत

पाटना : महाराष्ट्राच्या प्रणव घारे, सुरज चोरगे व परम माळी या कुस्तीपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आखाडा गाजवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे कुस्ती स्पर्धेतील महाराष्ट्राची ३ पदके आता पक्की झाली आहे. आता फक्त पदकाचा रंग कोणता हे मंगळवारी ठरेल.  

पाटनामधील ज्ञानभवन सांस्कृतीक हॉलमध्ये सुरू असणाऱ्या कुस्‍ती आखाड्यात मराठी मल्‍लांनी वर्चस्‍व गाजवले. मुलांच्या विभागात ५१ किलो गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारात राधानगरीच्या प्रणव घारे याने चुरशीच्या उपांत्य लढतीत हरियाणाच्या हर्ष कुमारचा ६-४ गुण फरकाने पाडाव करीत अंतिम फेरी गाठली. 

९२ किलो फ्रीस्टाईल प्रकारात पुण्याच्या सुरज चोरगे याने दिल्लीच्या मिराज सिंग झोकेर याला साडेतीन मिनिटांपर्यंत चाललेल्या उपांत्य लढतीत १२.० गुणांनी लोळविले. गेल्या वर्षी उत्तराखंड येथे झालेल्या कॅडेट नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या सुरजकडून मंगळवारी सुवर्णपदकाची अपेक्षा असेल. पुण्यातील हनुमान आखाडा येथे प्रशिक्षक गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो.

ग्रीको रोमन प्रकारातील ८० किलो गटात परम माळी याने उपांत्य लढतीत मध्य प्रदेशच्या सिद्धार्थ जोशीचा ११-४ गुण फरकाने अवघ्या तीन मिनिटांत फडशा पाडत सुवर्णपदकाची लढत निश्चित केली. भारंदाज डावावर सलग गुण जिंकून परमने कुस्‍ती गाजवली. मुलींच्या विभागातील ६१ किलो फ्रीस्टाईल प्रकाराच्या उपांत्य लढतीत अकोल्याच्या शृष्टी श्रीनाथ हिला पंजाबच्या विशाखाकडून ०-४ अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे तिला आता कांस्य पदकासाठी लढावे लागेल. याचबरोबर रिपॅचेसमधून ग्रीको रोमनच्या ५५ किलो गटातून आदित्य तापे व ५१ किलो गटात हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्राला कांस्य पदक जिंकून देण्यासाठी खेळताना दिसणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *