
- यजमान बिहार संघाचा १०३ गुणांनी धुव्वा
पाटना : महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघाने सलग दोन सामने जिंकून ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीतील धडक मारली आहे.
पाटीलपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळ संघाचा ७२-५९ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून त्विशा शर्मा २५ गुण, रेवा कुलकर्णी १२ गुण, वैष्णवी परदेशी ११ गुण, आर्या फटांगरे ९ गुण, रिशिता कुलकर्णी ७ गुण, हर्षला पाटील ६ गुण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मध्यंतराला महाराष्ट्राचा संघ ३३ विरुद्ध ३० अशा तीन गुणांनी पिछाडीवर होता. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला खेळ उंचावत संघाला १३ गुणांनी विजेतेपद प्राप्त करून दिले.
दुसर्या सामन्यात महाराष्ट्र संघाने यजमान बिहार संघाचा १०३ गुणांनी धुव्वा उडवत ११८ विरुद्ध १५ असा विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून तन्वी जाधव १९ गुण, रेवा कुलकर्णी १८ गुण, साईशा भगत १८ गुण, वेदिका सिंग १७ गुण यांनी मोलाची कामगिरी बजावली. मंगळवारी महाराष्ट्राचा संघ पंजाब विरुद्ध आपल्या गटातील अंतिम सामना खेळेल. प्रशिक्षिका मुद्रा अग्रवाल तसेच सहप्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेते शत्रुघ्न गोखले यांचे संघाला मार्गदर्शन मिळत आहे. गत तामिळनाडू स्पर्धेत महाराष्ट्राने कांस्य पदक जिंकले होते.