ऋतुजा बक्षीने पटकाविला वुमन इंटरनॅशनल मास्टर किताब

  • By admin
  • May 13, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः स्पेन येथे जुलै २०२४ मध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात छत्रपती संभाजीनगरची जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेती खेळाडू ऋतुजा बक्षी हिने वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब प्राप्त केला आहे.

वुमन इंटरनॅशनल मास्टर किताबाचे ३ नाॅर्म पूर्ण करताना पहिल्यांदा सिक्कीम येथे राष्ट्रीय सीनिअर बुद्धिबळ स्पर्धेत पहिला नाॅर्म मिळवून प्रारंभ केला तर दुसरा आणि तिसरा नॉर्म ऋतुजाने स्पेन येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात पूर्ण केले आहेत.
स्पेन येथील पहिल्या स्पर्धेमध्येच ग्रँडमास्टर युरी (२४८१ मानांकन) याला पराभवाचा धक्का देत दणदणीत सुरुवात केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर ब्लेंड अँटीलिओ व उत्सव चॅटर्जी यांना हरवून ५९ गुणांनी मानांकन वाढवले.
 
दुसऱ्या स्पर्धेमध्ये ऋतुजाने ग्रँडमास्टर नॉर्वेको मार्क याला बरोबरीत रोखले तर वुमन ग्रँडमास्टर क्रस्ते बलेस्लावा हिला देखील बरोबरीत रोखून २९ गुणांची कमाई केली.

तिसऱ्या स्पर्धेमध्ये ऋतुजाने २४७७ गुणांकन असलेल्या सोहम भट्टाचार्याला हरविले. तसेच फिडे मास्टर वेन लॉरेन्स आणि इतर मानांकित खेळाडूंना पराभवाचे धक्के देत तब्बल ७२ गुणांनी आंतरराष्ट्रीय मानांकन वाढवून २२०२ एवढे प्राप्त करुन इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे सर्व नाॅर्म व मानांकन पूर्ण करीत डब्ल्यूआयएम हा किताब पटकाविला.

वयाच्या सहाव्या वर्षी २००५ मध्ये ऋतुजाने छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा राज्य बुद्धिबळ स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये दरवर्षी राज्य विजेतेपद मिळवताना तब्बल २७ राज्य विजेतेपद पटकावत विक्रम प्रस्थापित केला.

शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये  ठाणे, रंगा रेड्डी, जबलपूर आणि नलगोंडा येथे विजेतेपद मिळवताना चार सुवर्णपदक आणि तीन रौप्य पदक देखील मिळवले तर दिल्ली येथे वुमन नॅशनल ऍमेच्युअर स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले तर २०११ मध्ये पाँडिचेरी येथे तेरा वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील आपला ठसा उमटवताना दुबई येथे १४ वर्षांखालील जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे विश्व विजेतेपद पटकाविले तर दिल्ली येथे राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ऋतुजाने सुवर्णपदक जिंकून केंद्र सरकारच्या उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान देखील प्राप्त केला होता.

डब्ल्यूआयएम किताब प्राप्त खेळाडू ऋतुजाला मुंबईचे ज्येष्ठ प्रशिक्षक सजनदास जोशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे आणि लवकरच ऋतुजा अजून वरच्या स्तरावरील कामगिरी करेल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

ऋतुजाच्या या मोठ्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, तसेच सचिव हेर्मेंद्र पटेल, किशोर लव्हेकर, अजय पटेल, ऋतुजाचे विद्यमान प्रशिक्षक मुंबईचे सजनदास जोशी तसेच विजय देशपांडे, गणेश देशपांडे, अमरीश जोशी, अमित देशमुख, अंजली सागर, विशाल नरोटे, चंद्रशेखर कोरवी, अनुप कपाडिया, रेणुका बोरामणीकर, लेख मिठावाला, किशोर लव्हेकर, विलास राजपूत, मिथुन चव्हाण, अजित देशमुख आणि सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *