
पुणे ः पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, पुणे आयोजित पुणे जिल्हा मुलींच्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष वडकीनाला ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सागरदादा मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय पंच कॅप्टन सुरेश कदम, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष जीवनलाल निंधाने, पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष डॉ राहुल पाटील, पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष विनोद कुंजीर, चेतना वारे, अनिकेत जामदार, अंजनीकुमार जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याच्या हवेली, बारामती, खडकी, इंदापूर, पुरंदर, भोर, शिरूर, दौंड, मुळशी आदी भागातील १०७ मुली या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे विनोद कुंजीर यांनी आभार मानले.