
पुरुष व महिला गटात मुंबई संघाचा विजयाचा झंकार
नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ५९व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईने आपली दादागिरी ठसठशीतपणे अधोरेखित केली. पुरुष व महिला या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत मुंबईने राज्य कॅरमवर आपली पकड सिद्ध केली.
पुरुष गटाच्या सांघिक अंतिम फेरीत मुंबईने पुण्याचा २-१ अशा फरकाने पराभव केला. पहिल्या एकेरीत महम्मद घुफ्रानने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-०, २४-१० असे चितपट करत जोरदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या एकेरीत प्रशांत मोरेने अभिजित त्रिपणकरवर २५-११, १७-१६ असा विजय मिळवत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुण्याला एकमेव दिलासा दुहेरीत मिळाला. अनिल मुंढे व रहीम खान या जोडीने मुंबईच्या राहुल सोळंकी व सिद्धांत वाडवलकर यांना १८-३, २४-८ असे नमवले. मात्र, तो विजय पुण्याच्या एकूण पराभवाला थोपवू शकला नाही.
ठाण्याचा तिसऱ्या क्रमांकासाठी झंझावात
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरवर ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. पंकज पवारने संजय मणियारला २०-१३, २५-१६ असे पराभूत केले. झैद फारुकीने सज्जाद शेखला २५-३, २२-१ अशी धूळ चारली. दुहेरीत महम्मद व समीर अंसारीच्या जोडीने मंगेश पंडित व मुनेश राजाला २५-८, २५-२२ अशी मात दिली.
रंगतदार एकेरी सामने
एकेरीच्या तिसऱ्या फेरीत विविध जिल्ह्यांच्या खेळाडूंनी जबरदस्त झुंज दिली. संजय मणियार (मुंबई उपनगर) याने अभिषेक चव्हण (रत्नागिरी) याला २५-२२, १९-१६ असे हरवले. ओमकार नेटके (मुंबई) याने मिलन पांचाळ (मुंबई उपनगर) याचा २३-१३, २०-४ असा पराभव केला. संजय कोंडविलकर (रत्नागिरी) याने सुशांत वैराट (मुंबई) याच्यावर २१-१९, १२-२१, १८-११ असा चुरशीचा विजय संपादन केला.
रहीम खान (पुणे) याने राजेश रिकामने (मुंबई) याचा २२-९,२५-० असा पराभव केला. महम्मद रझा (मुंबई) याने सुरेश बिस्त (रायगड) याचा १०-२५, १४-७, २५-९ असा पराभव केला. सलमान खान (मुंबई) याने आशुतोष गिरी (पालघर) याच्यावर २५-२, २५-२४ असा विजय संपादन केला. जावेद शेख (मुंबई उपनगर) याने ऋषिकेश तिरमारे (सांगली) याच्यावर २५-०, २५-१ असा विजय साकारला. सचिन घटकांबळे (मुंबई) याने रोहित चौगुले (कोल्हापूर) याचा १८-९, ०-२५, १९-५ असा पराभव केला. विवेक कांबळे (मुंबई उपनगर) याने अविष्कार मोहिते (ठाणे) याच्यावर १३-१६, २५-११, १९-१८ असा चुरशीचा विजय नोंदवला. राजेश गोहिल (रायगड) याने सुरज कुंभार (मुंबई) याच्यावर २५-१२, २५-१९ असा विजय नोंदवला. विश्वनाथ देवरुखकर (मुंबई उपनगर) याने राहुल भस्मे (रत्नागिरी) याच्यावर १४-१८, २५-१४, २५-१ असा विजय नोंदवला. रईस शेख (जळगाव) याने किरण भोपनीकर (मुंबई उपनगर) याचा २५-०, १७-५ असा सहज पराभव केला.