
पंजाब-दिल्ली सामना पुन्हा खेळवणार
मुंबई ः भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. १७ मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होईल. सर्व सामने सहा मैदानांवर खेळवले जाणा आहेत. अंतिम सामना ३ जून रोजी खेळला जाईल.
पंजाब आणि दिल्ली यांच्यात पुन्हा सामना होणार
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलले होते. १८ व्या हंगामातील ५८ सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळलेला सामना समाविष्ट होता. सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि त्यामुळे तो अनिर्णीत राहिला. मात्र, आता बीसीसीआयने हा सामना पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ २४ मे रोजी जयपूरमध्ये आमनेसामने येतील.
नवीन वेळापत्रकात दोन डबलहेडर
बीसीसीआयने सोमवारी आयपीएल २०२५ हंगामातील उर्वरित १७ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. उर्वरित सामने बंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद या सहा मैदानांवर खेळवले जातील. नवीन वेळापत्रकात दोन डबलहेडर देखील समाविष्ट आहेत. पहिला डबल हेडर सामना १८ मे रोजी आहे. रविवारी दुपारी राजस्थान रॉयल्सचा सामना जयपूरमध्ये पंजाब किंग्ज संघाशी होईल, तर त्याच दिवशी संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सचा सामना दिल्लीमध्ये गुजरात टायटन्सशी होईल. तर, दुसरा डबल हेडर २५ मे रोजी होईल. रविवारी, गुजरात टायटन्स दुपारी चेन्नई सुपर किंग्ज संघाशी तर सनरायझर्स हैदराबाद संध्याकाळी ७:३० वाजता कोलकाता नाईट रायडर्सशी लढेल. २८ मे, ३१ मे आणि २ जून रोजी कोणतेही सामने खेळवले जाणार नाहीत.
प्लेऑफ कधी सुरू होतील?
प्लेऑफ २९ मे पासून सुरू होतील. पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी होईल. एलिमिनेटर सामना ३० मे रोजी खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना १ जून रोजी खेळवला जाईल तर अंतिम सामना ३ जून रोजी होईल. या चारही सामन्यांच्या ठिकाणांची घोषणा नंतर केली जाईल.
गुजरात अव्वल स्थानावर
आयपीएल २०२५ चा हंगाम पुढे ढकलला जाईपर्यंत गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर होते. गुजरात ११ सामन्यांत आठ विजय आणि तीन पराभवांसह १६ गुणांसह पहिल्या स्थानावर होता. दुसऱ्या स्थानावर आरसीबी संघ होता ज्याचे गुजरातसारखे गुण आहेत. पंजाब तिसऱ्या स्थानावर होता, तर मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर होता. सीएसके, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते, तर दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या आशा अजूनही जिवंत होत्या.