अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलची १०० टक्के निकाल परंपरा कायम

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 2 Views
Spread the love
  • आशा वर्करचा मुलगा मोहित पाटील शाळेतून प्रथम
  • अंध फिजिओथेरपिस्टच्या मुलीला व्हायचं अधिकारी

जळगाव ः जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे दोघं प्रथम (९२.००%), जान्हवी प्रदीप सोनवणे, रिया एकनाथ नेमाडे हे दोघेही द्वितीय (९१.६० %) व मिताली सुकलाल नाथ, घोषिता जयंत पाटील हे दोघंही – तृतीय (९१.०० %), भावेश विकास गरूड हा चतुर्थ (९०.८० %), धीरज विकास पाटील हा पाचवा (९०.६०) अशी सुरेख टक्केवारी घेत विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी अभिनंदन केले.  

१६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. १० विद्यार्थी ९० टक्क्यांच्यावर गुणप्राप्त केले. तर उर्वरीत विद्यार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. 

१०० टक्के निकालाची परंपरा कायम 

आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असतानाही चिकाटीने अभ्यास करून यश प्राप्त केल्याने अनुभूतीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक आहे. स्कूलच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत  सातत्याने शाळेचा १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राखल्याने शिक्षकांसह सहकाऱ्यांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.

आईच्या खडतर प्रवासाला स्कूलमधून 
पहिला येऊन मोहितने दिला आनंद  

वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले. आई शिवणकाम करून संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करते. आजोबा साथीला आहेत. मात्र बहिण भार्गवीसह कुटुंबाचा गाडा पुढे नेताना आई-आजोबांना तारेवरची कसरत करावी लागते. आता आई शिवणकामासोबतच आशा वर्करचे काम करते. दोघांच्या खडतर प्रवासाची जाणीव असून अनुभूती स्कूलमधून प्रथम आल्याने त्यांना आनंदाची अनुभूती देता आली हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. अशी प्रतिक्रिया पहिला आलेला मोहित पाटील याने व्यक्त केली आहे.

अंध फिजिओथेरपिस्टच्या मुलीचे अधिकारी होण्याचे स्वप्न

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमुळे आमचे कार्यसिद्धीस झाले अशी प्रतिक्रिया अंध फिजिओथेरपी करणाऱ्या जयंत पाटील यांची आहे. आपल्या कन्येने मिळविलेल्या यशाबद्दल आम्ही आनंद आहेच, समाजातील वंचित गरजू घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना घडविण्याचे काम भवरलाल जैन यांनी केले तेच काम अशोकभाऊ पुढे घेऊन जात आहे. तृतीय आलेल्या घोषिता पाटील हिचे स्वप्न स्पर्धा परीक्षा देऊन मोठं अधिकारी होण्याचे आहे. दहावीत शिक्षकांनी विशेष क्लास घेऊन अभ्यास घेतला त्यामुळे आम्हाला यशस्वी होता आले, अशी प्रतिक्रिया घोषिता हिने व्यक्त केली आहे.

स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या रियाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. अशा प्रकारे परिस्थितीशी दोन हात करून अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.
           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *