सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुली सरस

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

आभा सोमणला सुवर्ण, आसावरी राजमानेला रौप्य पदक 

पटना (बिहार) : तळपत्या उन्हात सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या रोड सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सुवर्णासह रौप्यपदक पटकावित चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. ६० किलोीटर वैयक्तिक सायकल शर्यतीत मुंबईच्या आभा सोमणने सुवर्ण, तर सांगलीच्या आसावरी राजमाने हिने रूपेरी यशाला गवसणी घातली.

गंगा नदीच्या किनार्‍यावरील मरीन ड्राईव्ह परिसरात संपलेल्या या सायकलिंग शर्यतीत देशभरातील ३१ युवा खेळाडूंनी भाग घेतला होता. शर्यतीत सुरूवातीपासून महाराष्ट्राच्या आभा सोमण, आसावरी राजमाने व गायत्री ताम्बवेकर यांनी आघाडी घेतली होती. २० किलोमीटरनंतर आभा, आसावरी, गायत्रीसह तामिळनाडूच्या के हंसिनी यांच्यात शर्यत रंगली. शेवटच्या टप्पात आभा व आसावरीने मुसंडी मारत एकत्रित शर्यत पूर्ण केली. अंतिम क्षणी आभाने बाजी मारली. २.२१.४६.९४१ तासाची वेळ देत आभाने सुवर्णपदकावर नाव कोरले. २.२१.४६.९८७ वेळेत शर्यत पूर्ण करीत आसावरीने रूपेरी यश संपादन केले.

तिसर्‍या व चौथ्या स्थानासाठी चुरस पहाण्यास मिळाली. गायत्री व के हंसिनी यांनी एकत्रित शर्यत पूर्ण केली. के. हंसिनीने २.२१.४७.६८० वेळ नोंदवून कांस्यपदकाचे यश संपादन केले. २.२१.४७.७०९ वेळेत शर्यत पार केलेल्या गायत्री ताम्बवेकर हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रोड सायकलिंग स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य पदकाची लयलूट करत महाराष्ट्राने मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. विजेतेपद जिंकल्यानंतर पटना मधील मरीन ड्राईव्ह परिसर महाराष्ट्राच्या जयघोषाने दुमदुमला. महाराष्ट्राच्या यशासाठी प्रशिक्षिका दीपाली बारगुजे, दर्शन बारगुजे, स्वप्नील माने, भूषण चव्हाण यांनी योगदान दिले.

पुण्यात सराव करणार्‍या आभा सोमणने पर्दापणतच सुवर्ण पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला आहे. आसावरी राजमाने ही महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असून, तिचे वडील सांगलीच्या एमआयडीसीत कामगार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *