
पुणे ः सातारा येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदी शैलेश टिळक यांची तर महासचिवपदी दत्ता आफळे यांची निवड करण्यात आली.
बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत केंद्र सरकार आग्रह धरत असलेल्या नूतन क्रीडा धोरणाचा भाग असलेल्या वयाच्या आणि महिला सहभागासंदर्भातील नियमांच्या पालनास या निवडणुकीत प्रारंभ करण्यात आला आहे. याच निवडणुकीत संघटनेच्या सर्व सदस्यांनी पुण्याचे युवा उद्योजक पुनित बालन यांना संघटनेचे प्रमुख आश्रयदाते म्हणून नियुक्ती करण्याचा एकमताने ठराव पारित केला.

कोल्हापूर, सांगली, सातारासह मुंबई, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, रत्नागिरी अमरावती तसेच नागपूर असे २१ जिल्हे राज्य संघटनेला संलग्न असून या सर्व प्रतिनिधींच्या इच्छेनुसार ही निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.
निवडणुकीच्या प्रारंभीपासून संपूर्ण कार्यकृती निवृत्त जिल्हा न्यायमूर्ती दिलीप गायकवाड जे या प्रक्रियेचे मुख्य निवडणूक अधिकारी होते. त्यांच्या निगराणीखाली निवडणूक घेतली गेली तर निवडणुकीवेळी भारतीय ज्युदो फेडरेशनचे निरीक्षक म्हणून गोवा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष गुरुदत्त भक्ता आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे निरीक्षक म्हणून राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे निलेश जगताप उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेश टिळक यांनी भविष्यातील कार्यक्रम आयोजनाबाबत कल्पना देताना सांगितले की, यामध्ये जपान भारत सौहार्द कार्यक्रमांतर्गत जपानी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २४ मे दरम्यान बालेवाडी पुणे येथे आयोजित होणारे शिबिर आणि नूतन स्पर्धा नियमांच्या आंतरराष्ट्रीय ज्युदो फेडरेशनने केलेल्या बदलांसंदर्भात जून महिन्यातील राज्य पंच शिबिराबाबत पुणे येथील आयोजन आहे. महासचिव दत्ता आफळे यांनी येत्या तीन वर्षांत महत्वाकांक्षी आशियाई ज्युदो स्पर्धांच्या आयोजनाबाबत तयारी सुरू केली जाणार असल्याचे प्रतिपादन केले.
राज्य ज्युदो संघटनेची नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष- शैलेश टिळक (रत्नागिरी), उपाध्यक्ष विकास पाटील (सातारा), सुरेश समेळ (मुंबई), गणेश शेटकर (बीड), यतीश बंगेरा (मुंबई), महासचिव दत्ता आफळे (छत्रपती संभाजीनगर), कोषाध्यक्ष रवींद्र मेटकर (नाशिक), सहसचिव चंद्रशेखर साखरे (सांगली), सभासद सतीश पहाडे (अमरावती), मुकूंद डांगे (नागपूर), वृषाली लिंग्रस (कोल्हापूर).
सल्लागार मंडळ ः धनंजय भोसले (सातारा), रत्नाकर पटवर्धन (नाशिक), राजकुमार पुनकर (अमरावती), पुरुषोत्तम चौधरी (नागपूर) आणि रवींद्र पाटील (मुंबई).
तांत्रिक समिती अध्यक्ष ः दर्शना लखानी (मुंबई) आणि सचिव योगेश धाडवे (पुणे).
स्वीकृत सदस्य – दिनेश बागुल (धुळे), तीलक थापा (ठाणे), प्रवीण कुपटीकर (नांदेड), प्रवीण गडदे (धाराशिव), जयेंद्र साखरे (यवतमाळ), राजेश गायधनी (गोंदिया). महिला प्रतिनिधी – अर्चना पहाडे (अमरावती), शोभना शेटकर (बीड).