अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी

  • By admin
  • May 14, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love
  • दहा सुवर्णांसह १५ पदकांची लयलूट

पाटना (बिहार) : खेलो इंडियाच्या इतिहासात महाराष्ट्राने प्रथमच अ‍ॅथलेटिक्सच्या मैदानावर १० सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्य अशी एकूण १५ पदकांची लयलूट करीत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. ही ऐतिहासिक कामगिरी करताना महाराष्ट्राच्या धावपटूंनी तीन नवे विक्रम प्रस्तापित केले, हे विशेष. 

बुधवारच्या दिवशी हर्षल जोगे, भूमिका नेहासे व अंचल पाटील या मराठमोळ्या खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविले. याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला रिले संघाने रौप्य पदकाने स्पर्धेची सांगता केली.

पाटनातील पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी अ‍ॅथलेटिक्सचा थरार समाप्त झाला. मुलांच्या ८०० मीटर शर्यतीत हर्षल जोगे याने १ मिनिट ५३.९९ सेंकद वेळेसह बाजी मारत महाराष्ट्राला आज अ‍ॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीच्या या खेळाडूने अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सोनेरी यश संपादन केले. उत्तर प्रदेशच्या ग्यान सिंग यादवने १ मिनिट ५४.९० सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले, तर उत्तराखंडचा सुरज सिंग १ मिनिट ५६.७० सेंकद वेळेसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला. 

नाशिकच्या भूमिका नेहासे हिने मुलींच्या २०० मीटर शर्यतीतील बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने ही थरारक लढत २४.५१ सेंकदात जिंकली. हरयाणाच्या प्रिशा मिश्रा हिला २४.६२ सेंकद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर तिचीच राज्य सहकारी आरती कुमारी हिने २४.९४ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

मुलींच्या उंच उडीत ठाणे जिल्ह्याच्या अंचल पाटील हिने १.६८ मीटर उडी मारत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. श्रीनिवास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही सुवर्ण उडी घेतली. पश्चिम बंगालच्या समाप्ती घोष हिने १.५५ मीटर उडीसह रौप्यदपकाला गवसणी घातली. तमिळनाडूूची ब्रिंदा ए ही १.५५ मीटर उडीसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. समाप्ती आणि ब्रिंद्रा यांनी सारखीच उडी मारली असली, अधिक फाऊलमुळे बिंद्राला तिसरे स्थान मिळाले.

रिले टीमला सुवर्णपदकाची हुलकावणी
श्रेष्ठा शेट्टी, भूमिका नेहासे, कशिश भगत, मानसी देहरेकर या महाराष्ट्राच्या चौकडीला मुलींच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत एका सेंकदाच्या फरकाने सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ३ मिनिटे ४९.४४ सेंकद वेळेसह महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या संघाने ३ मिनिटे ४८.४४ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली. तामिळनाडूला ३ मिनिटे ५१.५५ सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले.

कोट

‘राज्याचे क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी खेलो इंडियाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सात दिवशीय सराव शिबिरात जातीने लक्ष घातले. राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनीही खेळाडूंच्या सरावात कुठलीच कमतरता राहणार नाही याची काळजी घेतली. खेळाडूंचे वैयक्तिक प्रशिक्षक आणि इतर प्रशिक्षकांच्या टीम वर्कमुळे महाराष्ट्राला यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करता आली. बालेवाडीतील अद्ययावत सुविधांचा खेळाडूंना खुप फायदा झाला. सर्व खेळाडू सात दिवस एकत्र राहिल्याने रिलेसारख्या शर्यतीत आम्हाला सोनेरी यश मिळविता आले आणि महाराष्ट्राने ऐतिहासिक १० सुवर्णपदके जिंकताना तीन स्पर्धा विक्रमही केले.’ 

  • सुहास व्हानमाने (मॅनेजर, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *