
एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदके पटकावली
पटना (बिहार) : महाराष्ट्राच्या टेनिसपटूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली. मुलींच्या दुहेरीत ऐश्वर्या जाधव-आकृती सोनकुसारे या जोडीला सुवर्णपदक मिळाले. ऐश्वर्या जाधव हिने मुलींच्या एकेरीतही रौप्यपदकाची कमाई केली. मुलांच्या एकेरीत अर्णव पापरकर, तर मुलींच्या दुहेरीत नैनिका रेड्डी व प्रिशा शिंदे जोडीला कांस्यपदक मिळाले.
ऐश्वर्या जाधवचे दुहेरी यश
मुलींच्या दुहेरीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधव-आकृती सोनकुसारे या द्वितीय मानांकित जोडीने अंतिम फेरीत तेलंगणाच्या लक्ष्मी दांडू व रिशिता रेड्डी या अव्वल जोडीचा ६-०, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. याचबरोबर ऐश्वर्या जाधव हिने मुलींच्या एकेरीत रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या लढतीत या द्वितीय मानांकित खेळाडूला अव्वल मानांकित तेलंगणाच्या रिशिता रेड्डी हिने ६-१, २-६, ६-३ असे हरविले. पहिला सेट गमविल्यानंतर ऐश्वर्याने दुसरा सेट जिंकून लढतीत पुनरागमन केले होते. मात्र, तिसर्या व निर्णायक सेटमध्ये अनेक टाळता येण्याजोग्या चुका केल्याने ऐश्वर्या हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरने चतुर्थ मानांकित समर्थ साहिता याचा ६-०, ५-२ असा धुव्वा उडवून कांस्यपदक जिंकले. दुसर्या सेटमध्ये दुखापतीमुळे समर्थने २-५ असे पिछाडीवर असताना लढत सोडून दिली. मुलींच्या दुहेरीत नैनिका रेड्डी व प्रिशा शिंदे या महाराष्ट्राच्या बिगरमानांकित जोडीने चतुर्थ मानांकित उत्तर प्रदेशच्या महिका खन्ना व शगून कुमारी या जोडीचा ६-२, ६-२ असा पराभव करीत कांस्यपदकाला गवसणी घातली.