
जागतिक विद्यापीठ स्पर्धेसाठी हाफ मॅरेथॉन प्रकारात दुसऱ्यांदा निवड
सोलापूर ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अरुण धनसिंग राठोड याची जागतिक विद्यापीठ हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी भारताच्या विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
त्याच्या निवडीचे पत्र विद्यापीठात प्राप्त झाले असल्याची माहिती विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी दिली. भारतीय विद्यापीठ संघात सलग दुसऱ्यांदा त्याची निवड झाली असून जर्मनी येथे १६ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत तो भाग घेईल.
आश्रम शाळा बोरोटीतून कामगिरीची सुरुवात
परमानंदनगर बाबलाद तांडा (ता. अक्कलकोट) येथील अरुण राठोड. आश्रम शाळा बोरोटी येथे सातवीत असतानाच महाबुले सरांच्या मार्गदर्शनाखाली ४०० व ६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने प्रथम स्थान मिळविले. त्यानंतर रुद्रेवडी येथील म्हेत्रे कनिष्ठ आश्रम महाविद्यालयात ३ व ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.
रवी राठोड यांनी नेहरूनगर शासकीय मैदानावर स्वामी समर्थ अकॅडमीमध्ये त्यांचा तंत्रशुद्ध सराव घेतला. तेथून त्याची ३, ५ व १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशी कामगिरी बहरली. संगमेश्वर, शिवाजी रात्र महाविद्यालय व सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय व विद्यापीठ स्पर्धाबरोबरच असोसिएशनच्या १५ हाफ मॅरेथॉन व ३ फुल मॅरेथॉनमध्ये विजेता ठरला. ५० किलो मिटरच्या १ अल्ट्रा मॅरेथॉनमध्येही बाजी मारली. प्राचार्य डॉ. सुरेश पवार, शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण, संतोष गवळी, विद्यापीठाचे प्रशिक्षक किरण चोकाककर व अशोक पाटील यांचे मार्गदर्शन त्याची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्यात मोलाची ठरली.
यंदा कामगिरी नक्की सुधारणार
गतवर्षी म्हणजेच २०२३ मध्ये सोलापूर विद्यापीठाकडून जागतिक विद्यापीठ अर्ध मॅरेथॉन शर्यतीत प्रथमच सहभागी होऊन सुवर्ण पदकापासून २.२० मिनिटे पिछाडीवर होतो. निवडीचे पत्र विद्यापीठात प्राप्त झाले आहे. त्यासाठी मी सोलापूर व नाशिक येथे कसून सराव करीत आहे. यंदा माझ्या कामगिरीत नक्की सुधारणा होईल
- अरुण राठोड, धावपटू.
अरुणची आतापर्यंतची कामगिरी
- चीनमध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्ण पदकापासून २.२० मिनिटे पिछाडीवर.
- १७व्या एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेत कांस्य व सांघिक सुवर्ण
- एकता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १४वे स्थान
- १३ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग, १० व २१ किलोमीटरमध्ये रौप्य व सुवर्ण
- विद्यापीठ चौथ्या खेलो इंडियात १० किलोमीटरमध्ये सुवर्ण व ५ किलोमीटर मध्ये कास्य.
- अखिल भारतीय विद्यापीठ हाफ मॅरेथॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, दहा हजार मीटर धावणे सुवर्ण