
मुंबई ः नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या ५९ व्या सीनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या सामन्यात मुंबईच्या प्रशांत मोरेने बाजी मारली. महिला एकेरीत आकांक्षा कदम हिने विजेतेपद पटकावले.
पुरुष गटात अंतिम सामन्यात प्रशांत मोरे याने पुण्याच्या सागर वाघमारेचा २५-२, २५-० असा धुव्वा उडवला. सुरुवातीपासूनच प्रशांतने आपली पकड ठेवत हा एकतर्फी विजय मिळवला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हिने मुंबईच्या मिताली पाठकवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १४-१७, २५-२, २५-१ असा विजय मिळवला. पहिला सेट जिंकलेल्या पुढील दोनही सेटमध्ये आकांक्षाने मितालीला डोके वर काढू दिले नाही.
पुरुष वयस्कर एकेरीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या फैय्याझ शेख याने मुंबईच्या सत्यनारायण दोंतुलवर २३-७, २५-११ असा सरळ विजय नोंदवला. तर महिला वयस्कर एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या मिनल लेले खरेने सरळ दोन सेटमध्ये कोल्हापूरच्या शोभा कामतवर २१-१९, २४-१६ असा विजय मिळवला.
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या प्रफुल मोरेने ठाण्याच्या समीर जबीर अंसारीला तर महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला हरवले. पुरुष वयस्कर गटाच्या तिसरा क्रमांक मिळवताना मुंबईच्या हेमंत पांचाळने पुण्याच्या संजय थिटेला व महिला वयस्कर एकेरी गटात तिसरा क्रमांक मिळवताना मुंबईच्या रोझिना गोदादने मुंबई उपनगरच्या माधुरी तायशेटेला नमवले. विजेत्या खेळाडूंना नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय एस पाटील, मानद सचिव विजय आर पाटील, स्पर्धेचे प्रमुख विक्रांत शिंदे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष भारत देसडला, उपाध्यक्ष धनंजय साठे, मानद सचिव अरुण केदार , खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे सचिव जितेंद्र दळवी यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.