
मुंबई : ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी यांच्या समर्पित भावनेने गुणवान खेळाडूंना येथील “हाय परफॉर्मन्स कॅम्प” मधून योग्य संधी आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असल्याचे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने म्हटले आहे.
कलिना येथील एअर इंडियाच्या मैदानावर या कॅम्पसाठी पुन्हा एकदा भारतात येऊन मला खूप आनंद होतो आहे. याच शिबिरातून यापूर्वी यशस्वी जैस्वाल (जो सध्या भारतीय संघातून आणि अगदी आयपीएलमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीची कमाल दाखवत आहे) तसेच पृथ्वी शॉ अशा गुणवान खेळाडूंना घडताना मी पाहिले आहे. आता देखील या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवू शकतील असे कितीतरी युवक येथे पाहायला मिळत आहेत. दिव्यांश सक्सेना, अयाझ खान हे खेळाडू त्यांचा वारसा पुढे चालवू शकतील असे त्याने पुढे सांगितले.
युवा वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करताना त्याने ऑफ सीझन ट्रेनिंगचा विशेष उल्लेख करून याच वेळी तुम्ही मसल स्ट्रेंग्थ कशी वाढवायची, धावण्याचा व्यायाम, पोहण्याचा व्यायाम करताना नुसतेच जास्त वेळ पोहण्यापेक्षा पाण्यात चालणे, पाण्यातून बॉलिंग अॅक्शन करताना वाढणारी हाताच्या स्नायूंची ताकद या गोष्टींवर भर दिला. नेहमी पूर्ण जोमात वेगवान गोलंदाजी न करता एखाद दिवस तो सराव करायचा आणि अन्य दिवशी अचूक टप्पा, आणि दिशा यावर गोलंदाजी कशी करायची याचे देखील मार्गदर्शन केले.
आता अन्य दिवसांमध्ये निव्वळ नेट्स मध्ये येऊन गोलंदाजी करण्यापेक्षा फलंदाजाला वेगवेगळ्या पद्धतीने कसे बाद करायचे ते आत्मसात करण्यावर भर द्यायचा आहे, फलंदाज आपल्या गोलंदाजीचा ज्या प्रकारे विचार करतो त्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळेच वेगवान गोलंदाजाकडे निव्वळ ताकद नाही तर विचार करणारे सुपीक डोके सुद्धा हवे असेही पुढे सांगितले. वेगवान गोलंदाज म्हटले कि ताकद कमावण्यासाठी मांसाहार हवाच यात काहीही तथ्य नसल्याचे सांगून जवागल श्रीनाथ सारखा शाकाहारी गोलंदाज सुद्धा त्याच जोमाने सर्वात वेगवान गोलंदाजी कसा करीत होता हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान या कॅम्प मध्ये फलंदाजांना मार्गदर्शन करणारा, रणजी स्पर्धेतील धावांचे ‘रन मशीन’ वासिम जाफर याने आपण गेली कित्येक वर्ष ज्वाला आणि एमसीसी बरोबर जोडलो गेलो असून अशा प्रकारचे कॅम्प युवा खेळाडूंना खेळातील सर्व गोष्टी आत्मसात करून त्यांना घडविण्यात मोठा हातभार लावतात असे सांगितले. या कॅम्प मधून देखील खेळाडू मिळालेल्या ज्ञानाचा लाभ उठवून नेक्स्ट लेव्हलला जातील असा विश्वास व्यक्त केला. या कॅम्प मध्ये एमसीसीच्या भारतभरातील अडीचशे पेक्षा जास्त मुलांचा आणि मुलींचा सहभाग आहे.
१० दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी मुंबई, ठाण्यासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून युवा खेळाडू दाखल झाले आहेत. सुरुवातीला नेट्स मधील सराव सत्रानंतर प्रत्यक्ष सामने खेळण्याची संधी देखील या मुलांना मिळणार आहे. चामिंडा वास, वासिम जफर, ज्वाला सिंग यांच्यासह आणखीन २०-२५ क्रिकेट प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या खेळाडूंना मिळणार आहे.