
पुणे ः पुणे शहर बॉक्सिंग संघटना व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांचा संयुक्त विद्यमाने यावर्षी १९ ते ३० मे या कालावधीत बॉक्सर सौरभ धांडोरे याच्या स्मरणार्थ मोफत उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे
अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर सायंकाळी पाच ते सात या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या व प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यातून घडविले आहेत.
पुण्यातील खेळाडूंची शारीरिक सुदृढता, शारीरिक कौशल्य विकास, बॉक्सिंग खेळातील विविध कौशल्य व खेळातील डावपेच, विविध स्पर्धा प्रकार व त्याचे महत्त्व, निरामय जीवन कौशल्य पद्धती त्यातून गुणवत्ता वाढावी याकरीता पुणे शहर बॉक्सिंग संघटना व प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला आहे.
सदर उन्हाळी बॉक्सिंग शिबिरात सहभाग झालेल्या पुण्यातील व जिल्ह्यातील विविध बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रशिक्षणातील नवीन तंत्रज्ञान, साहित्यांची ओळख, उपयोगिता, इतर देशातील खेळांडूची खेळण्याची पद्धत अशा विविध स्वरुपांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू कसा घडेल याचा अनुभव पुण्यातील खेळाडूंना मिळण्यास मदत होईल. या उन्हाळी बॉक्सिंग शिबिराचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पुणे शहर कोचिंग कमिशनचे चेअरमन बंडू गायकवाड (8805719404) यांच्याशी संपर्क साधावा, असे पुणे शहर बॉक्सिंग संघटेचे सचिव विजय गुजर यांनी केले आहे.