कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण उपविजेतेपद 

  • By admin
  • May 15, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

आयुषा, सुजयकडून सुवर्ण सांगता; २ सुवर्ण,  १ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई

पाटणा (बिहार) : मराठमोळ्या कुस्तीगीरांनी २ सुवर्णपदकांसह ७ पदकांची लयलूट करीत सातव्या खेलो इंडिया युथ स्पर्धेची सुवर्ण सांगता केली. महाराष्ट्राच्या आयुषा गाडेकर व सुजय तनपुरे यांनी सुवर्णपदक जिंकून आखाडा गाजविला. स्पर्धेत १८ पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण उपविजेतेपदही महाराष्ट्राच्या संघाने पटकावले.

ज्ञानभवन सांस्कृतिक हॉलमध्ये संपलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्राचा जयजयकार शेवटच्या दिवशी देखील घुमला. २ सुवर्ण,  १ रौप्य, ४ कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई महाराष्ट्राने केली. कुस्ती स्पर्धेला भेट देत पदकविजेत्या कुस्तीगरांचे पथक प्रमुख महादेव कसगावडे, अरूण पाटील, शिवाजी कोळी यांनी अभिनंदन केले.

मुलींच्या फ्रीस्टाईल ५७ किलो गटात वाशिमच्या अनुष्का गाडेकरने चीतपट कुस्तीचे प्रदर्शन घडवत सुवर्णपदक पटकावले. हरियाणाच्या अंशुल विरूद्ध सुरूवातीपासून अनुष्काने आक्रमक लढत दिली. ६-० गुणांने आघाडीवर असताना १ मिनिटातच झोळी डावावर तिने अंशुलला चीतपट करीत मैदान गाजवले. मुंबईत साईच्या कुस्ती केंद्रात सराव करणार्‍या आयुषा पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत पदकाचा करिश्मा घडविला. १५ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या आयुषा लौकिकाला साजेसा खेळ करीत सुवर्ण कामगिरी केली.

फ्रीस्टाईलच्या ७१ किलो गटात अहिल्यानगरच्या सुजय तनपुरेने चंदीगडच्या सुशांत वशिष्ठला ६-० गुणांनी मात करीत पदार्पणातच खेलो इंडियाच्या सुवर्ण यशाला गवसणी घातली. पहिल्या फेरीत २-० गुणाने आघाडी घेत सुजयने आपले वर्चस्व दाखवले. दुसर्‍या फेरीत आक्रमण करीत एकतर्फी लढत जिंकली. १७ वर्षीय सुजय पुण्यतील मामासाहेब मोहोळ संकुलात सराव करतो.

मुलांच्या ग्रीको रोमन प्रकारातील ६० किलो गटात कोल्हापूरच्या ऋषिकेश नाईक, चुरशीच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या प्रांजल दहिया कडून पराभूत व्हावे लागले. पहिल्या फेरीत ०-५ गुणांनी प्रणव मागे होता. दुसर्‍या फेरीत भारव्दांज डावावर ५-५ बरोबरी करीत ऋषिकेशने लक्षवेधी कुस्तीचे प्रदर्शन घडवले. शेवटच्या मिनिटाला प्रांजल दाहियाने तुफानी कुस्ती करीत ऋषिकेशला ५-९ गुणांनी पराभूत केले. १६ वर्षीय ऋषिकेश बेळगावातील सेनादलाच्या कुस्ती केंद्रात मेहनत घेत असतो.

मुलींच्या ६५ किलो फ्रीस्टाईल गटात सृष्टी करे हिने कर्नाटकच्या प्रतीक्षा भोवी हिला चितपट करत कांस्यपदक पटकावले. पहिल्या डावात ६-० ने आघाडी घेतल्यानंतर तिने दुसर्‍या फेरीत १०-२ गुणांची आघाडी घेत चीतपट कुस्ती केली. सातार्‍याच्या सृष्टीचे हे खेलो इंडिया स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. गत स्पर्धेत ती पराभूत झाली होती. कोल्हापूरातील मुरगुडमधील कुस्ती केंद्रात ती दादा लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते.

फ्रीस्टाईल ६० किलो गटातील कांस्यपदकाच्या लढतीत मध्यप्रदेशचा यश जाधव गैरहजर राहिल्याने प्रणव मोरेला विजयी घोषित करण्यात आले. ग्रीको रोमन ९२ किलो गटात सूरज जामदारने राजस्थानच्या कुनाल आर्चायाला चितपट करीत कांस्यपदकावर नाव कोरले. याच गटात पंजाबच्या वंशदिप सिंगवर महाराष्ट्राच्या हर्ष ठाकरेने ७-३ गुणांनी मात करीत कांस्य पदकाचे यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *