
- मुलांना दुसरे सर्वसाधारण विजेतेपद
- दोन सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्यपदकांची कमाई
राजगीर : बिहारमध्ये पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रीय खेळाडूंच्या तलवारी चांगल्याच तळपल्या. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने दुसरे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण ६ पदके जिंकली.
मुलांच्या विभागात महाराष्ट्र संघाला तलवारबाजी इपी सांघिक प्रकारात सुवर्णपदक, तर फॉईल सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या मुलांनी इप्पी सांघिकमध्ये पंजाब, मणिपूर, हरियाणा संघाचा पराभव करत सुवर्णपदक नाव कोरले. अटीतटीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने हरियाणाचा ४५-४३ गुण फरकाने पाडाव केला. या संघात साईप्रसाद जंगवाड, पियुष कोल्हे, प्रथमेश कस्तुरे, आदित्य निकते या खेळाडूंचा समावेश होता.

फॉईल मुलांच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशचा ४३-२३ पराभव करून एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य लढतीत माणिपूरकडून ४५-४० च्या फरकाने निसटता पराभव झाल्यामुळे महाराष्ट्र संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या संघात रोहन शहा, स्वराज डोंगरे, अर्जुन सोनवणे, कार्तिक चटप हे खेळाडू होते.
या शानदार यशाबद्दल मैदानात खेळाडूंनी भेट घेत पथकप्रमुख महादेव कसगावडे,, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, तलवारबाजी संघटनेचे राज्य सचिव डॉ उदय डोंगरे, डॉ दिनेश वंजारे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
मुलींच्या विभागात एक रौप्य आणि कांस्य
मुलींच्या विभागात इपी सांघिकमध्ये महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळाले. जान्हवी जाधव, प्राजक्ता पवार, सियारा पुरंदरे, मिताली परदेशी या चौकडीने हे रूपेरी यश मिळविले. उत्तराखंड संघाला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली. मग कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, हरियाणाने अंतिम फेरीत महाराष्ट्राला ४२-३९ असे हरवून सुवर्णपदक जिंकले.
फॉईल प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला कांस्यपदक मिळाले. प्राजक्ता गाढवे, मानसी हेलसुळकर, अनुष्का अंकमुळे, यशस्वी वंजारे या संघाने महाराष्ट्राला हे कांस्यपदक जिंकून दिले. पंजाबचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत हरयाणाकडून २०-४५ फरकाने पराभूत झाल्याने महाराष्ट्राला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. संघा सोबत प्रशिक्षक म्हणून अजिंक्य दुधारे, सागर मगरे, तुषार आहेर, शिल्पा मोरे, पवन भोसले, तर व्यवस्थापक राजेंद्र आव्हाड होते.