< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक – Sport Splus

महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

  • By admin
  • May 15, 2025
  • 0
  • 92 Views
Spread the love

खेलो इंडिया युथ स्पर्धेत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य पदकांसह १५८ पदकांची लयलूट

पाटणा : गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी करत ऐतिहासिक पराक्रम केला. ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले. तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही महाराष्ट्राने यंदाच्या ७व्या खेलो इंडिया स्पर्धेत केला आहे.

पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील समारोप समारंभात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खेडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरविण्यात आले. पथक प्रमुख महादेव कसगावडे, सहाय्यक संचालक भाग्यश्री बीले, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शिवाजी कोळींसह मराठमोळ्या खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. करंडक स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

खेलो इंडिया स्‍पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व्‍यासपीठ निर्माण झाले आहे असू सांगून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पुढे म्‍हणाल्‍या की, स्‍पर्धेत माझ्या महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकली याचा मला आनंद आहे, महाराष्ट्रसह सर्व पदकविजत्‍यांचे मी अभिनंदन करते.

मध्य प्रदेश, तामिळनाडू पाठोपाठ बिहारमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदकांचे शिखर पूर्ण करीत विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसंचालक सुधीर मोरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे अभिनंदन केले. गत तामिळनाडू स्पर्धेत ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदके मिळवून महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. मध्यप्रदेश पाठोपाठ तामिळनाडूत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

बिहार स्पर्धेत महाराष्ट्राने ९ स्पर्धा विक्रमाची नोंद केली. वेटलिफ्टिंग अस्मिता ढोणेने २, साईराज परदेशीने ३, अ‍ॅथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर, रोहित बिन्नार, आदित्य पिसाळ व रिले संघाने प्रत्येकी १ असे एकूण ९ स्पर्धा विक्रम प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावापुढे झळकले आहेत.

अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ७ व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले. हरियाणाने ३९ सुवर्ण, २७ रौप्य, ५१ कांस्य पदकांसह एकूण ११७ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. राजस्थान २४ सुवर्ण, १२ रौप्य, २४ कांस्य एकूण ६० पदकांसह तिसर्‍या स्थानावर राहिला.

स्पर्धेतील २७ पैकी २२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांचा करिश्मा घडविला. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १० सुवर्णपदकांना गवसणी घातली, तर जलतरणात ७ सुवर्णासह एकूण २९ पदके कमविली. जिम्नॅस्टिक्समध्ये ६, आर्चरीत ६, वेटलिफ्टिंगमध्ये ५ सुवर्णपदके महाराष्ट्राने पटकावली. कुस्ती, सायकलिंग, नेमबाजीत महाराष्ट्राने सुवर्ण चौकार झळकवला. सेपक टकरॉ, गटका, रग्बी या खेळातही महाराष्ट्र चमकला. स्पर्धत ४३७ खेळाडूंसह १२८ प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण ५६५ जणांचे पथक सहभागी झाले होते.

महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेतील पाचव्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पाच वेळा, तर हरियाणाने एकदा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. २०१८ पासून दिल्ली येथून खेलो इंडिया स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले होते. २०१९ साली पुणे, २०२० साली आसाम स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२३ साली मध्य प्रदेशमधील स्पर्धेत विजेतेपद महाराष्ट्राने खेचून आणले. गतवर्षी २०२४ मध्ये तामिळनाडूत महाराष्ट्र चॅम्पियन ठरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *