
मुंबई ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या सौजन्याने आयोजित मोफत किकबॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर अनंत नारायण दळवी मैदान, सायन येथे यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात ५३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट, शितो रियू स्पोर्ट्स कराटे आणि किकबॉक्सिंग असोसिएशन, तसेच स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना आत्मरक्षण कौशल्य, शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक उमेश मुरकर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक विघ्नेश मुरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर मार्क धरमाई यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, क्रीडाशिस्त व फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला असून, अशा उपक्रमांचे आयोजन वारंवार व्हावे, अशी मागणी पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.