
- आरबीआय बँक शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : आरबीआय बँक शील्ड टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलिट ग्रुपमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने (आरबीआय) न्यू इंडिया अॅश्युरन्सवर (एनआयए) ७ विकेट राखून विजय मिळवला. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अर्श धोंडीची (हॅट्ट्रिकसह ४ विकेट) प्रभावी गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
पोलीस जिमखाना येथे झालेल्या सामन्यात मंगळवारी न्यू इंडिया अॅश्युरन्स संघाला २० षटकांत ७ बाद १५४ धावा करता आल्या. चांगल्या सुरुवातीनंतर धोंडीने मधली फळी मोडून काढली. मध्यमगती गोलंदाज अर्श धोंडीने १८ व्या षटकात पहिला धक्का दिला. त्याने एनआयएचा चौथ्या क्रमांकावरील फलंदाज शौर्य नागरला १६ धावांवर बाद केले. सामन्यातील शेवटच्या आणि अंतिम षटकात सलग तीन विकेट घेत त्याची हॅटट्रिक घेत प्रतिस्पर्ध्यांच्या धावसंख्येला ब्रेक लावला. २०व्या षटकात त्याने रोहित शुक्ला (२), प्रशांत चव्हाण आणि आयुष सावंत यांना (दोघेही शून्य धावा) बाद केले.
१५५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना सुमीत घाडीगावकर (३७) आणि सिद्धिथ तिवारीने (नाबाद ४८) एनआयएच्या गोलंदाजांना सहज खेळून काढताना आरबीआय संघाला सात विकेट आणि ३४ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांच्या हस्ते पोलीस जिमखाना मैदानावर नाणेफेक करून आरबीआय बँक शील्ड टी-२० क्रिकेट एलिट स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आरबीआयच्या कार्यकारी संचालक चारुलता एस. कर आणि आरबीआयच्या प्रादेशिक संचालक सुमन रे आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : न्यू इंडिया अॅश्युरन्स – २० षटकांत ७ बाद १५४ (हर्ष उबाळे ५०, अनिश शेट्टी ३७, संस्कार दहेलकर २८ नाबाद, अर्श धोंडी ४/२७) वि. आरबीआय स्पोर्ट्स क्लब – १४.२ षटकांत ३ बाद १५५ (सुमीत घाडीगावकर ३७, सिद्धिथ तिवारी ४८ नाबाद, रोहित शुक्ला २/४४). निकाल: आरबीआय स्पोर्ट्स क्लब ७ विकेट राखून विजयी.