जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे विभागीय सचिवांना पत्र
सोलापूर ः दहावी परीक्षेच्या निकालात सोलापूर येथील काही खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणांचा लाभ झालेला दिसून येत नाहीए. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सात विद्यार्थ्यांची शिफारस करुन त्यांना गुण देण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रेक्षा गोविंद मंत्री (किकबॉक्सिंग), सोहम सागर मर्दा (तलवारबाजी), समर्थ प्रभुराज घोडके (बुद्धिबळ), शहानूर ताजुद्दीन शेख (शुटिंग), तनिष्का काकासाहेब गुंड (वुशू), स्वरुप सुरेश चव्हाण (शुटिंग), यथार्थ आप्पासाहेब पाटील (सॉफ्टबॉल) अशा सात खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेच्या निकालात ग्रेस गुणांचा फायदा मिळालेला नाही. या सर्वांना ग्रेस गुण देण्यात यावे अशी शिफारस करणारे पत्र महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) विभागीय सचिवांना पत्राद्वारे केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून २०२४-२५ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या खेळाडूंना वाढीव गुणाबाबतचे प्रस्ताव या कार्यालयाकडे ऑनलाईन प्राप्त झालेले होते. या कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावाची ऑनलाईन छाननी करून आपणाकडे डेस्क ०३ कडे शिफारस करून पाठवण्यात आले होते. परंतु, पाठवलेल्या प्रस्तावातून काही खेळाडूंना गुण मिळाल्यामुळे आपणाकडे चौकशी केली असता ऑनलाईन प्रस्ताव आपणाकडे दिसत नाही असे सांगण्यात आले. परंतु, या कार्यालयाकडून ऑनलाईन पद्धतीने आपणाकडे गुण देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. काही गुण न मिळालेल्या खेळाडूंची नावे परिपत्रक याप्रमाणे त्यांची माहिती आपणाकडे सादर करीत आहोत. त्यांना गुण देण्यात यावेत अशी शिफारस जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.