​उच्च शिक्षणात पास…पण…जीवन कौशल्यांमध्ये नापास !!!

  • By admin
  • May 17, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love
  • राजेश भोसले,
    जागतिक जलतरण साक्षरता संकल्पक
    (95279 24646).

पहिली घटना

नुकतीच एक दुःखद घटना घडली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला शिकणारे आठ भावी डॉक्टर सुटीच्या दिवशी अभ्यासाचा ताण घालवावा म्हणून, विरंगुळा म्हणून नदी किनारी असलेल्या वाळू मध्ये व्हॉलिबॉल खेळायला गेले. खेळत असताना अचानक व्हॉलिबॉल पाण्यात गेला, म्हणून तो काढण्याच्या प्रयत्नात आठ पैकी ३ डॉक्टरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दुसरी घटना

खदानीत पोहायला गेलेल्या अभियंत्याचा बुडून मृत्यू…

तिसरी घटना

दिल्लीमध्ये कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी भरल्यामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या २० ते २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू…

चौथी घटना

मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात शिक्षक पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू.

पाचवी घटना

वहिनीला वाचविण्याच्या प्रयत्नात, सैनिकाचा पाण्यात बुडून मृत्यू..

अशा एक नव्हे, अनेक घटनांचे दाखले आपल्याला देता येतील. या घटनांचा अर्थ असा की…एक तर त्यांना पोहता येत नव्हते किंवा पोहता येत होते पण वाचवता आले नाही. किंवा ज्या जलस्त्रोतात आपण उतरत आहोत त्याची माहिती त्यांना नव्हती.

जो कुणी पहिल्यांदा पाण्यात बुडत असेल, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे बुडाले. किंवा पोहता येत होतं, पण सराव कमी पडला. पोहणे म्हणजे सोप असतं…
त्यात काय एवढं ? हा अति आत्मविश्वास नडला…पोहण्याचा मोह नडला. मित्रांचा आग्रह, इत्यादी इत्यादी.. अशी पाण्यात बुडण्याची असंख्य कारणे सांगता येतील.
तसेच, अशा एक नव्हे अनेक घटनांचे दाखले आपल्याला देता येतील.

या सर्व दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती या उच्चशिक्षीत होत्या. म्हणून आपल्या समोर खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते की, हे झाले कसे ? बरे झाले असेल ? याचे एकमेव कारण म्हणजे…जलतरणा सारख्या जीवनकौशल्याचा अभाव !!!

उपरोक्त घटनांमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले तरुण उच्चशिक्षीत होते. म्हणजेच निश्चित ते हुशार होते. जेईई, एनईईटी, यूपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देऊनच ते सर्वजण येथे पर्यंत पोहोचले होते. म्हणजे ते सर्वजण लहानपणापासून हुशार असणार. शालेय जीवनात नवोदय, स्कॉलरशीप या सारख्या इतर परीक्षा सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या असतील. साहजिकच यासाठी शाळेच्या व्यतिरिक्त शिकवणीसह इतर कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन वर्ग सुद्धा लावलेले असणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या वा उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुद्धा आराम न करता, मौज-मजा न करता, फक्त आणि फक्त अभ्यास एके अभ्यासच केलेला असणार…
पण, शेवटी एका साध्या जीवनकौशल्या अभावी त्या सगळ्यांना आपला जीव गमवावा लागला हे मोठे दुर्देवी आहे.

मान्य आहे की, जगामध्ये खूप स्पर्धा आहे, त्यासाठी अभ्यास करणे, अद्ययावत रहाणे, जगाच्या दोन पाऊले पुढे राहण्यासाठी जीवतोड मेहनत करणे अत्यावश्यक आहे. पण एक गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही, ती म्हणजे…”जान है तो जहान है”

आयुष्यात नोकरी, व्यवसाय हे सर्व आपल्यासाठी आहेत. आपण नोकरी, व्यवसायासाठी नाही. हे आपल्या लक्षात केंव्हा येणार ? उच्च शिक्षणाच्या नादात, खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या नादात, मोठ्या पॅकेजच्या नोकरीच्या नादात..आपण आपल्या मुलांना इतर महत्वपूर्ण जीवन कौशल्ये शिकविण्याचेच विसरुन गेलो.

शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांना कमी लेखणे, त्यांना गौण समजणे, त्या आत्मसात न करणे, हेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ‘घातक’ म्हणजे ‘जीवघेणे’ ठरत आहे. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे, डॉक्टर, अभियंता, शिक्षक, सैनिक यांचा ‘पोहता न आल्यामुळे पाण्यात बुडून झालेला मृत्यू…’

भविष्यात अनेकांचे प्राण वाचविणारेच स्वतःचे प्राण वाचवू शकले नाहीत…
त्या ठिकाणी उच्च शिक्षण कामी आले नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय असणार ?

यामध्ये पालकांची देखील चुक आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी जीवाचे रान केले. सीबीएससी, आयसीएससी सारख्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लाखो रुपये फी भरून त्यांना शिकवले, नामांकित क्लासेसची पाच आकडी फी दोन-चार टप्पे करून का होईना पण भरली. आणि इतर खर्च ही भरमसाठ केला. कारण, मुलांना उच्चशिक्षित करणे त्यांच्यासाठी महत्वपूर्ण होते.

पण… हे औपचारीक शिक्षण घेत असताना कला, क्रीडा आणि कार्यानुभव या सारखे महत्वपूर्ण जीवनोपयोगी शिक्षण आम्ही आमच्या मुलांना कधी दिलेच नाही. श्रमप्रतिष्ठा व इतर सामाजिक मुल्ये त्यांच्यामध्ये रुजविलीच नाहीत. ज्या प्रमाणे संगणक व इतर महत्वपूर्ण विषयांचे ज्ञान आपण आपल्या पाल्याला शालेय जीवनातच व्हावे म्हणून, धडपड करतो, त्याचप्रमाणे जलतरणा सारखे जीवनावश्यक जीवन कौशल्य सुद्धा शालेय जीवनातच शिकवले गेले पाहिजे. म्हणजे विद्यार्थी, ते खूपच लवकर आत्मसात करतात. त्याचा सराव करून त्यामध्ये ते पारंगत होतात.
शाळेमधे धोकादायक स्थळांची माहिती दिली जाते. त्याचा उपयोग भावी आयुष्यातील धोके ओळखण्यासाठी होतो.

शालेय जीवनात शिकलेली जीवनकौशल्ये आयुष्य वाढवत नाहीत, तर जीवनाचा दर्जा वाढवतात. (क्वालिटी ऑफ लाईफ) म्हणून प्रत्येकांनी आपल्या आयुष्यात चांगल्या शिक्षणासह जीवनोपयोगी कौशल्य शिकून, एखादा छंद जरूर जोपासावा. त्यातल्या त्यात जल हे जीवन आहे, ते मृत्यूचे कारण ठरूच नये म्हणून जलतरणासारखे जीवनोपयोगी कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *