धनराज पिल्ले, प्रवीण ठिपसे, विजू पेणकर यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदान देणार्या पत्रकारांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिले जाणारे ‘महेश बोभाटे स्मृती क्रीडा पुरस्कार’ आणि ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ यांचे वितरण सोमवारी (१९ मे) सायंकाळी ६ वाजता भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार ऑलिम्पियन धनराज पिल्ले यांच्या हस्ते होणार आहे. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील पाच वर्षांचे पुरस्कारांचे यंदा एकत्रितपणे वितरण होणार आहे.
ज्येष्ठ पत्रकारांसाठी दिला जाणारा ‘महेश बोभाटे स्मृती पुरस्कार’ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र टाइम्सचे निवृत्त पत्रकार शरद कद्रेकर, संजय परब, एबीपी माझाचे विजय साळवी आणि नवराष्ट्रचे सुभाष हरचेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह आणि रोख १०,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
युवा पत्रकारांसाठीचे २०२० ते २०२४ सालचे ‘आत्माराम मोरे स्मृती क्रीडा पुरस्कार’ अनुक्रमे सामनाचे मंगेश वरवडेकर, नवशक्तीचे तुषार वैती, महाराष्ट्र टाइम्स डिजिटलचे प्रसाद लाड, सकाळचे जयेंद्र लोंढे आणि लोकमतचे रोहित नाईक यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह आणि रोख ७,००० रुपये असे आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील.
‘कोविड काळापासून विविध कारणांमुळे हे पुरस्कार वितरण रखडले होते. यंदा मात्र पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे या दिग्गज पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा विश्वात या पत्रकारांनी दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे,’ असे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.