मुंबई ः मुंबईचे माजी यष्टीरक्षक फलंदाज विजय कारखानीस यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.
आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक असलेल्या विजय कारखानीस यांनी रणजी विजेत्या मुंबईसाठी ७ रणजी सामन्यात २८९ धावा केल्या. शिवाय यष्टीमागे (११+८) १९ बळी टिपले. मद्रासविरुद्ध रणजी अंतिम सामन्यात (१९६७-६८) ५३ आणि ४३ अनमोल धावा करताना कर्णधार मनोहर हर्डीकर यांच्या साथीने मुंबईचा डाव सावरण्याची भूमिका पार पाडताना मुंबईच्या सलग दहाव्या रणजी विजयात मोलाची भूमिका बजावली. सेंट्रल बँक आणि शिवाजी पार्क जिमखान्यासाठी कारखानीस टाइम्स शिल्ड, कांगा लीग क्रिकेट स्पर्धामध्ये खेळले.आक्रमक फलंदाजी ही त्यांची खासियत. कांगा लीगमध्ये एका मोसमात ४००/५०० धावा फटकावण्याची किमया कारखानीस यांनी केली आहे.