
निलंगा ः निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय येथे महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील क्रीडा संचालक व सहयोगी प्राध्यापक डॉ गोपाळ मोघे यांच्या ‘ॲनाटोमी, फिजिओलॉजी अँड कीन्स्लॉजी इन फिजिकल एज्युकेशन’ या पुस्तकाचे विमोचन मानव संसाधन विकास व युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते दूरदृष्टीप्रणालीद्वारे झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर हे होते .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्था येथील कुलगुरू प्राध्यापक इंदू बोरा तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ पियुष जैन हे उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी हे देखील ऑनलाइन सहभागी झाले होते.
या कार्यक्रमांमध्ये डॉ प्रदीप देशमुख, प्राचार्य भागवत पवळ, तसेच प्राचार्य डॉ पाटील, माजी प्राचार्य डॉ माधव कोलपुके, प्रभारी प्राचार्य डॉ भास्कर गायकवाड व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस मानवंदना करून सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रारंभी प्रास्ताविक डॉ गोपाळ मोघे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आपल्या पुस्तकाविषयीची भूमिका विशद केली. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी सर्वांचे स्वागत दूरदृष्टीप्रणालीद्वारे केले.
त्यानंतर इंदू बोरा तसेच पियुष जैन, डॉ मनोज रेड्डी व डॉ पी एन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शिक्षण समितीचे सदस्य व प्राचार्य भागवत पोळ यांनी प्रासंगिक मत व्यक्त केले व पुस्तकाबद्दल डॉ गोपाळ मोघे यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ अजित मुळजकर यांनी केले. डॉ नरेश पिनमकर यांनी आभार मानले.
हे पुस्तक नवीन शिक्षण धोरण २०२० प्रमाणे बीपीएड व एमपीएड या पदवी व पदव्युत्तर शिक्षण अभ्यास कामासाठी उपयोगी आहे व ॲमेझॉनवर रुपये ७५० रुपयांत उपलब्ध आहे. पुस्तक प्रकाशनासाठी प्राध्यापक मोघे यांचे सर्व कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते.