पंजाब किंग्जचा राजस्थानवर १० धावांनी विजय

  • By admin
  • May 18, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

नेहल वधेरा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रारची शानदार कामगिरी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेलचे अर्धशतक व्यर्थ

जयपूर ः नेहल वधेरा (७०), शशांक सिंग (नाबाद ५९) आणि हरप्रीत ब्रार (३-२२) यांच्या बहारदार कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १० धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबने १७ गुणांसह गुणतालिकेत आपली स्थिती भक्कम केली आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी पंजाबला हा विजय महत्वाचा ठरला आहे. ध्रुव जुरेलची (५२) अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

राजस्थान रॉयल्स संघाने डावाची सुरुवात आक्रमक केली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने अवघ्या ४.५ षटकात ७६ धावांची वादळी सुरूवात संघाला करुन दिली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने तुफानी फलंदाजी केली. वैभव याने अवघ्या १५ चेंडूत ४० धावांची बहारदार खेळी करुन संघाला अपेक्षित सुरुवात करुन दिली. त्याने चार चौकार व चार षटकार ठोकत मैदान गाजवले. पाचव्या षटकात हरप्रीत ब्रार याने वैभवची वादळी खेळी संपुष्टात आणत संघाला पहिले यश मिळवून दिले.

वैभव बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. यशस्वी जैस्वाल ५० धावांची दमदार खेळी करुन बाद झाला. यशस्वी याने २५ चेंडूत ५० धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. त्याने नऊ चौकार व एक षटकार मारला. यशस्वी बाद झाल्यानंतर लगेचच संजू सॅमसन देखील बाद झाला. ११व्या षटकात राजस्थान संघाने ११४ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. संजूने १६ चेंडूत २० धावांचे योगदान दिले. त्याने एक चौकार व एक षटकार मारला.

रियान पराग अवघ्या १३ धावांवर बाद झाला. हरप्रीत ब्रार याने परागला क्लीन बोल्ड बाद करुन सामन्यातील तिसरा बळी मिळवला. रियान पराग बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघावर धावगती कायम ठेवण्याचे मोठे दडपण आले. ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर या आक्रमक फलंदाजांना त्यांच्या शैलीप्रमाणे फलंदाजी करणे सोपे जात नव्हते. त्यामुळे दबाव वाढत गेला. या दबावात हेटमायर (११) बाद झाला. त्यानंतर राजस्थान संघाच्या विजयाची शक्यता अंधूक बनली. ध्रुव जुरेल याने ३१ चेंडूत ५१ धावांची तुफानी खेळी केली. जुरेलने चार षटकार व तीन चौकार मारले. राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकात सात बाद २०९ धावा काढल्या.

पंजाबची धमाकेदार फलंदाजी
नेहल वधेरा आणि शशांक सिंग यांच्या अर्धशतकांच्या मदतीने पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्ससमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले. पंजाबने २० षटकांत पाच गडी गमावून २१९ अशी धावसंख्या उभारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी ३४ धावांत तीन विकेट गमावल्या. तथापि, नेहल वधेराने प्रथम डावाची सूत्रे हाती घेतली आणि २५ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या बाद झाल्यानंतर शशांक सिंगने आक्रमक फलंदाजी केली ज्यामुळे पंजाबने २०० च्या पुढे धावसंख्या गाठली.

सुरुवातीच्या अपयशानंतर वधेराने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत चौथ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. श्रेयस बाहेर पडला, पण वधेरा थांबला नाही. त्याने शानदार अर्धशतक झळकावले, पण आकाश माधवालने वधेराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वधेरा ३७ चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकारांसह ७० धावा काढून बाद झाला. तथापि, शेवटच्या षटकांमध्ये, शशांकने अझमतुल्लाह उमरझाईसोबत सहाव्या विकेटसाठी २४ चेंडूत ६० धावा जोडून पंजाबला चांगल्या स्थितीत आणले.

पंजाबकडून शशांकने ३० चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ५९ धावा केल्या, तर उमरझाईने नऊ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २१ धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने २५ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावांचे योगदान दिले, प्रभसिमरन सिंगने १० चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २१ धावांचे योगदान दिले आणि प्रियांश आर्यने ९ धावांचे योगदान दिले तर मिशेल ओवेन खाते न उघडताच बाद झाला. राजस्थानकडून तुषार देशपांडेने दोन, तर क्वेना म्फाका, रियान पराग आणि आकाश माधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *