
जीएसएमचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर ः एमआयटीच्या टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या वरिष्ठ लॉन टेनिस स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जीएसएमचे अध्यक्ष यज्ञवीर कवाडे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी निवृत्त न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ विनायककुमार राठोड यांनी स्पर्धेला भेट दिली तर पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर हे स्वतः या स्पर्धेत खेळत आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना यज्ञवीर कवाडे म्हणाले की, “ही स्पर्धा केवळ खेळासाठी नाही, तर एक सकारात्मक जीवनशैली जपण्याचा संदेश देते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सक्रिय राहणे आणि खेळात सहभागी होणे हे आरोग्यासाठी आणि समाजासाठी आवश्यक आहे.”
एमआयटी शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ आणि वरिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गेली तीन वर्षे ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जात आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी टेनिस प्रशिक्षक किशोर घाडगे, तसेच विलास त्रिभुवन, शंकर लबडे, पंकज पेंडकर, राधे आटपळे, अनुपमा दराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेळाडूंच्या सुविधा, नियोजन आणि मैदान व्यवस्थापनासाठी संपूर्ण टीमने कार्यक्षमता दाखवली.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वरिष्ठ गटातील खेळाडू मोठ्या संख्येने आले असून यामध्ये एकेरी व दुहेरी सामने खेळवले जाणार आहेत. खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रेक्षकांनीही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
एमआयटी संस्थेमार्फत विविध वयोगटांतील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत खेळ संस्कृती बळकट केली जात आहे. संस्थेच्या पुढाकारामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात वरिष्ठ गटातील लॉन टेनिस खेळाला नवसंजीवनी मिळत आहे.