मुंबई ः महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २५ मे या कालावधीमध्ये राष्ट्रीय सब ज्युनियर व ज्युनिअर क्लासिक पुरुष व महिला राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा राजमाता जिजाऊ दीक्षांत हॉल, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
या स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टिंगचे सचिव डॉ प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी प्रा विजय वडगावकर यांच्याकडे असून या स्पर्धेसाठी भारतातून २६ राज्यातून ३५२ पुरुष खेळाडू व २५६ महिला खेळाडू यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
महाराष्ट्रातील नामवंत पंच, पदाधिकारी सुद्धा स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धा जानेवारी २०२३ मध्ये आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूरच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्यांना आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी सूर्यकांत गर्दे, खजिनदार महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग (9869736711) यांच्याशी संपर्क साधावा.