
जागतिक टेबल टेनिस स्पर्धा
नवी दिल्ली ः सोमवारी येथे झालेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत यशस्विनी घोरपडे आणि दिया चितळे या भारतीय महिला दुहेरी जोडीने प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. परंतु, सुतीर्थ मुखर्जी आणि अयहिका मुखर्जी यांना पराभव पत्करावा लागला.
शेवटच्या ३२ च्या सामन्यात चितळे आणि घोरपडे यांनी पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन केले आणि सिंगापूरच्या जेंग जियान आणि सेर लिन कियान या जोडीवर ६-११, ११-६, ११-६, ११-९ असा विजय मिळवला.
१४ व्या मानांकित भारतीय जोडी सुतीर्था आणि अयहिका यांना अॅनेट कॉफमन आणि झियाओना शान या खालच्या मानांकित जर्मन जोडीकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. त्यांना फक्त २३ मिनिटांत १-११, ११-१३, ७-११ असा पराभव पत्करावा लागला. चितळे आणि मानुष शाह यांच्या पराभवामुळे भारताची मिश्र दुहेरी मोहीमही संपुष्टात आली. भारतीय जोडीला ओह जुनसुंग आणि किम नाययोंग या कोरियन जोडीकडून ०-३ (८-११, ९-११, २-११) असा पराभव पत्करावा लागला.
पराभवाची हॅटट्रिक झेलणाऱ्या मानुष शाहसाठी हा निराशाजनक दिवस होता. मिश्र दुहेरीत पराभव झाल्यानंतर, तो पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरीत देखील पराभूत झाला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत शाहला सहाव्या मानांकित फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुनकडून ०-४ (५-११, ६-११, ६-११, ९-११) असा पराभव पत्करावा लागला. आठव्या मानांकित भारतीय जोडी शाह आणि मानव ठक्कर यांना बेनेडिक्ट दुडा आणि डांग किउ या बिगरमानांकित जर्मन जोडीकडून ५-११, ९-११, ११-८, ५-११ असा पराभव पत्करावा लागला.