
मलेशिया मास्टर्स
क्वालालंपूर ः भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले आहे. श्रीकांतसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण या बीडब्ल्यूएफ टूर सुपर ५०० मालिकेत जगातील अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. एवढेच नाही तर जागतिक क्रमवारीच्या दृष्टिकोनातूनही ही स्पर्धा महत्त्वाची आहे. श्रीकांत मुख्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला असला तरी, इतर भारतीय खेळाडू पात्रता फेरीत एकेरी गटातील आव्हान पार करू शकले नाहीत.
पुनरागमनाच्या मार्गावर असलेल्या श्रीकांतने त्याच्या दुसऱ्या पात्रता पुरुष एकेरीच्या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि चिनी तैपेईच्या हुआंग यू काईचा ९-२१, २१-१२, २१-६ असा पराभव केला. २०२१ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्याने यापूर्वी पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या कुओ कुआन लिनचा २१-८, २१-१३ असा पराभव करून शानदार सुरुवात केली होती. माजी जागतिक नंबर वन श्रीकांतला आता मुख्य ड्रॉमध्ये चीनच्या सहाव्या मानांकित लू गुआंग जू विरुद्ध कठीण आव्हान असेल.
सिंधू-प्रणय बुधवारी मोहीम सुरू करतील
इतर सामन्यांमध्ये, थारुन मन्नेपल्लीला थायलंडच्या पानिकाफोन तीरत्साकुलकडून १३-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला, तर एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यमला चीनच्या झू झुआन चेनकडून २०-२२, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या सामन्यात अनमोल खरबला तैपेईच्या हंग यी-टिंगने २१-१४, २१-१८ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत मोहित जगलान आणि लक्षिता जगलान यांनाही मलेशियन जोडी मिंग याप टू आणि ली यू शान यांच्याकडून १५-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. भारताचे अव्वल शटलर पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय बुधवारी स्पर्धेत आपापल्या मोहिमांना सुरुवात करतील. या स्पर्धेत सिंधू आणि प्रणॉय भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील.