उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ ः बागवे 

  • By admin
  • May 21, 2025
  • 0
  • 121 Views
Spread the love

पुणे ः उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर हे युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर बॉक्सिंग संघटना व क्रांतीवीर लव्हूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते ३० मे या कालावधीत बॉक्सर सौरभ धांडोरे यांच्या स्मरणार्थ मोफत उन्हाळी बॉक्सिंग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळात आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी युवा खेळाडूंशी संवाद साधताना रमेशदादा बागवे म्हणाले की, अशा शिबिराच्या माध्यमातून युवा खेळाडूंसाठी बॉक्सिंग खेळाची आवड निर्माण होते. तसेच करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून उन्हाळी बॉक्सिंग शिबीर हे एक उत्तम व्यासपीठ आहे. रमेशदादा बागवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संतोष धांडोरे यांच्या उपस्थितीत सौरभ धांडोरे यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, रेनॉल्ड जोसेफ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे आरओसी चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे, जीवनलाल निंदाने, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे
सहसचिव सनी परदेसी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे रिंग ऑफिशियल
प्रदीप वाघे, कुणाल पालकर, मंगेश यादव, मातंग एकता आंदोलनाचे पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद अडागळे आदी उपस्थित होते.

या शिबिरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर, राम जगताप, आंतरराष्ट्रीय बॉक्सर
कॅप्टन टी बी थापा, महाराष्ट्र बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक बंडू गायकवाड, ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश जगदाळे  हे प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये खेळाडूंचा आहार, शारीरिक तंदुरुस्ती व दुखापतींचे पुनर्वसन, योगा यासह या विषयांवर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. याचबरोबर प्रशिक्षण समारोप प्रसंगी एकदिवसीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय प्रशिक्षक ऋषिकांत वचकल यांनी केले. तसेच पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सदस्य राकेश भानू यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *