आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाइन स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा

  • By admin
  • May 21, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे एमसीए इंटरनॅशनल क्लबसाठी आयोजन

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे एमसीए इंटरनॅशनल क्लबसाठी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. या स्पर्धेत डिझाईन वर्क्स नवी मुंबईने प्रथम क्रमांक मिळवला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए) पुणे केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियम परिसरात प्रस्तावित ‘एमसीए इंटरनॅशनल क्लब’ साठी आयोजित करण्यात आलेल्या आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा ‘महा वंदन एमसीए अवॉर्ड्स’ या भव्य सोहळ्यात करण्यात आली.

ही स्पर्धा गेल्या चार दशकांत सार्वजनिक इमारतींसाठी घेण्यात आलेल्या मोजक्या ‘ओपन आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धां’पैकी एक असून, यापूर्वी १९८६ मध्ये इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स, नवी दिल्लीसाठी अशी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून एमसीएने आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक वास्तुकलेच्या स्पर्धांचा नव्याने प्रारंभ करत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.

स्पर्धेला मोठा प्रतिसाद
ही स्पर्धा ४ सप्टेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषदेद्वारे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली होती. ही स्पर्धा कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली. स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली होती. व्यावसायिक गट (प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स) आणि कल्पनाशील गट (विद्यार्थी गट) अशा दोन गटात स्पर्धा झाली. ९८ व्यावसायिक गटातून व ४७ विद्यार्थ्यांचे गट भारतातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांतून या स्पर्धेत सहभागी झाले होते.

१५ नोव्हेंबर, २०२४ रोजी सहभागी स्पर्धकांसाठी ‘प्री-डिझाईन मीट’ व स्थळदर्शन आयोजित करण्यात आले होते. अंतिम डिझाईन सादर करण्याची मुदत १० फेब्रुवारी, २०२५ होती. या स्पर्धेत एमसीएला एकूण ५६ व्यावसायिक व १० विद्यार्थ्यांचे डिझाईन्स प्राप्त झाले.

परीक्षण प्रक्रिया व मान्यवर परीक्षक मंडळ
स्पर्धेचे परीक्षण एमसीएच्या व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वास्तुविशारद यांच्या मान्यवर परीक्षक मंडळाने केले. एमसीए परीक्षक मंडळात रोहित पवार (अध्यक्ष, एमसीए), ॲड. कमलेश पिसाळ (सचिव, एमसीए), सचिन मुळे, सुशिल शेवाळे, सुहास पटवर्धन, अतुल जैन (एपेक्स कौन्सिल सदस्य) यांचा समावेश होता. तसेच व्यावसायिक परीक्षक मंडळात चंद्रशेखर कानिटकर (मुंबई), समीप पाडोरा (अहमदाबाद), पद्मश्री आर्किटेक्ट डॉ. गोपाल शंकर (तिरुअनंतपुरम), उषा रंगराजन (पुणे), विलास अवचट (अध्यक्ष, आयआयए), अबिन चौधरी (कोलकाता), विकास अचळकर (अध्यक्ष, आयआयए पुणे केंद्र), कपिल जैन (संयोजक, आयआयए पुणे केंद्र), महेश बंगड व पराग देशपांडे हे सहसंयोजक होते.

२६ एप्रिल २०२५ रोजी स्पर्धेतील सर्व ६६ निवड झालेल्या डिझाईन्सच्या प्रदर्शनाचे एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रदर्शनात विविध दृष्टिकोनातून सादर झालेली कल्पनाशील रचना सर्वांसमोर मांडण्यात आली.

विजेत्यांची घोषणा
स्पर्धेचा अंतिम निकाल स्पर्धेचे संयोजक आर्किटेक्ट कपिल जैन यांनी जाहीर केला. यात प्रथम क्रमांक डिझाईन वर्क्स नवी मुंबईने मिळवला. त्यांनी डिझाईनमध्ये ‘नॉन-बिल्डिंग’ संकल्पना वापरत स्थळाचा निसर्ग आणि स्टेडियम यांना अधोरेखित करणारा कल्पक दृष्टिकोन सादर केला आहे. द्वितीय क्रमांक आर्किटेक्टर सीड त्रिशूर (केरळ) यांनी मिळवला. त्यांनी आपल्या डिझाईनमध्ये महाराष्ट्रातील लेणींसारखी शैली वापरत, बेसाल्ट दगडाचा प्रभावी वापर करून अनोखे अंतरंग व बहिरंग साकारले आहे. तृतीय क्रमांक डेक्स आर्किटेक्चर अँड अर्बन डिझाईन पुणे या संस्थेने मिळवाल. त्यांनी महाराष्ट्राच्या किल्ल्यांपासून प्रेरणा घेत, सीएसईबी वापरून पारंपरिक शैली आणि आधुनिक गरजांची सुरेख सांगड घालण्यात आली आहे.

प्रोत्साहनपर पुरस्कार (प्रत्येकी ३ लाख)

१. एम ९ डिझाईन स्टुडिओ बंगळुरू, २. थम्ब इम्प्रेशन एलएलपी (सुरत), ३. डेमिनेशन्स एनएसके (नाशिक), ४. आर्किटेक्ट करण दर्डा (पुणे), ५. क्राफ्ट नॅरेटिव्हर (पुणे).

विद्यार्थी गटासाठी विशेष सन्मान
विद्यार्थी गटातून कोणत्याही विजेत्याची घोषणा करण्यात आली नाही. मात्र सर्व १० विद्यार्थ्यांच्या टीम्सना प्रत्येकी १० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व विशेष सन्मान देण्यात आला.

कोट

क्रिकेटच्या पलिकडे जाऊन दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून ही स्पर्धा घेतली गेली. संपूर्ण भारतातील प्रतिभावान आर्किटेक्ट्ससाठी हा एक ऐतिहासिक मंच ठरला आहे.

  • रोहित पवार, अध्यक्ष एमसीए.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *