
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक श्वेता जाधव हिने बीसीसीआय लेवल २ प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
बंगळुरू येथे एनसीए अकादमीत भारताचा माजी कसोटीपटू व दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली श्वेता जाधव हिने लेवल २ कोर्स पूर्ण केला. हा कोर्स पूर्ण करताना श्वेता जाधव समवेत अनेक मातब्बर खेळाडू होते. त्यात प्रामुख्याने पूनम राऊत, आर पी.सिंग, हर्षद खडीवाले, मनोज तिवारी, वरुण अरॉन, शाहबाज नदीम, धवल कुलकर्णी, दीपाली शर्मा, पारुल चौधरी या खेळाडूंचा समावेश आहे.
बीसीसीआय लेव्हल २ कोर्स पूर्ण करणारी श्वेता जाधव ही छत्रपती संभाजीनगरची पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. श्वेता जाधव ही सध्या रेल्वे संघाकडून खेळत आहे. श्वेता जाधव हिने आतापर्यंत महाराष्ट्र, रेल्वे, उत्तर प्रदेश, मिझोराम या संघांकडून दर्जेदार क्रिकेट खेळले आहे. इंडिया अ, इंडिया २५ संघातून देखील श्वेता जाधव ही खेळली आहे. भारतीय अंडर २५ महिला संघ पाकिस्तान दौऱयावर गेला होता. या संघात श्वेता जाधवचा समावेश होता. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी २० भारतीय खेळाडूंच्या टीममध्ये श्वेता जाधवचा समावेश होता. सीनियर, ज्युनियर गटात श्वेता जाधव हिने महाराष्ट्र संघाकडून अनेक सामने खेळले आहेत.
श्वेता जाधव हिने २०२३-२४ या वर्षात महाराष्ट्र महिला संघासाठी असिस्टंट कोच म्हणून भूमिका बजावली आहे. तसेच अंडर १९ मुलींच्या टीमची श्वेता जाधव हिने सहाय्यक प्रशिक्षक म्हणूुन काम पाहिले आहे. सध्या श्वेता जाधव ही वुमन महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणेरी बाप्पा या महिला टीमच्या असिस्टंट कोच या भूमिकेत कार्यरत आहे. श्वेता जाधव हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
श्वेता जाधवच्या या यशाबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कौन्सिलचे चेअरमन आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, एमसीए सहसचिव संतोष बोबडे, सदस्य राजू काणे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सहसचिव शिरीष बोराळकर, कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी श्वेताचे अभिनंदन केले आहे आणि नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.