महाराष्ट्र अव्‍वल स्‍थानावर, जलतरणात दुहेरी धमाका

  • By admin
  • May 22, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

पेंचक सिलटमध्ये सुवर्णपदक, कबड्डी-फुटबॉलमध्ये उपांत्‍य फेरीत

दीव ः महिलांच्‍या चमकदार कामगिरीच्या जोरावर पहिल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ४ सुवर्णांसह पदकतक्‍यात अव्‍वल स्‍थानावर झेप घेतली आहे. सागरी जलतरणात सलग दुसऱ्या दिवशी पदकाचा डबल धमाका पहाण्यास मिळाला. पेंचक सिलट प्रकारातही जयश्री शेटेने सोनेरी कामगिरी करीत दिवस गाजविला. महाराष्ट्राने बीच कबड्डी-फुटबॉलमध्येही उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे.

खेलो इंडिया युवा स्‍पर्धेपाठोपाठ बीच स्‍पर्धेतही महाराष्ट्राचा जयजयकार पहिल्‍या दिवसापासून घुमत आहे. दीवच्‍या घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत ४ सुवर्ण, ४ रौप्‍य आणि ६ कांस्यांसह एकूण १४ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने प्रथम स्‍थानावर मुसंडी मारली आहे. ४ सुवर्ण ९ पदकांसह मणिपूर दुसऱ्या, तर ४ सुवर्णासह एकूण ७ पदकांची कमाई करीत दीव-दमण तिसऱ्या स्‍थानावर आहे.

दीवच्‍या अरबी समुद्रात पुन्‍हा एकदा महराष्ट्राच्‍या मुलींनी वर्चस्‍व गाजवले. ५ किमी स्‍विमथॉन प्रकारात सलग दुसऱ्या दिवशी साताऱ्याच्‍या दीक्षा यादवने सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच प्रकारात रौप्‍य पदकही महाराष्ट्राच्‍या पूर्वा गावडेने जिंकून राज्‍यासाठी दुहेरी यश संपादले. रंगलेल्‍या ५ कि.मी. शर्यतीत दिक्षा व पूर्वाने सुरूवातीपासून आघाडी घेतली होती. कर्नाटकच्‍या आसरा सुधीरने कडवी झुंज दिली. अंतिम रेषेपर्यंत दिक्षा, पूर्वा व आसरामध्ये कमालीची चुरस दिसून आली. अखेर १ तास १०.१२ वेळ नोंदवून दीक्षाने बाजी मारली. केवळ १३ शतांश सेकंद मागे राहिलेल्‍या पूर्वाने १.१०.२९ वेळेत रूपेरी यश पटकावले. १.१०.२९ वेळ देत आसराला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

दीवच्‍या अरबी समुद्रात पहाटे ६ वाजता १० मीटर स्‍विमथॉनचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या १९ वर्षीय दीक्षा यादवने मुसंडी मारली होती. २ मिनिटे १८.०९ सेकंद वेळेत शर्यतीचा पल्‍ला पार करीत दीक्षाने सुवर्णपदक पटकावले. रौप्‍य व कांस्य पदकांसाठी अनुक्रमे महाराष्ट्राच्‍या पूर्वा गावडे व तामिळनाडूच्‍या एम आरना यांच्‍यात शर्यत रंगली. दोघींनीही एकाच वेळी अंतिम रेषा पार केली. अवघ्या १४ दशांश सेकंदाने पूर्वाला रूपेरी यशाने हुलकावणी दिली. २.१८.३८ वेळ देत आरनाने रौप्‍य, तर २.१८.५२ वेळ नोंदवून पूर्वाने कांस्यपदक जिंकले.

पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करणाऱ्या साताऱ्यातील दिक्षा आणि सिंधूदुर्गच्‍या पूर्वा यांनी १० कि.मी प्रकारातही पदकाचा करिश्मा घडविला होता. दिक्षाचे हे स्‍पर्धेचे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. प्रथमच अरबी समुद्रात पोहून जेली माश्यांचा अडथळा पार करीत दिक्षाने सोनेरी यश प्राप्‍त केले आहे.
पारंपारिक पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राचा रोज पदकदिन साजरा होत आहे. तिसऱ्या दिवशी ५० ते ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्‍या २१ वर्षीय जयश्री शेटे हीने नागालँडच्‍या खोनसाईने २८-४ गुणांनी हरवून सुवर्णपदकाची बाजी मारली. बुलढाणाच्या जयश्रीने आपल्‍या लौकिकाला साजेसा खेळ केला. दुबईतील विश्वकरंडक स्‍पर्धेत देशाचे प्रतिनिधित्‍व केले होते. गंडा प्रकारातील दुहेरीत रामचंद्र बदक व सचिन गर्जे यांनी तर रेगु सांघिक प्रकारात ओंकार अभंग, वैभव काळे व अंशुल कांबळे यांनी रौप्‍य पदके पटकावली आहेत.

बीच कबड्डीतील महिला गटात महाराष्ट्राने छत्तीसगडचा ५५-३९ गुणांनी पराभव करीत उपांत्‍य फेरीत मजल मारली आहे. साक्षी साखरे व हर्षा शेट्टी यांनी यशस्‍वी चढाय्या करीत, तर जुली मिस्कीटा, समृद्धी मोहिते, तेजा सपकाळ व साक्षी सावंत यांनी अचूक गडी टिपत विजयी घोडदौड कायम राखली. बीच सॉकरमधील पुरूष गटात महाराष्ट्राने गुजरातचा ६-५ गोलने पराभव करीत उपांत्‍य फेरी गाठली. शुक्रवारी उपांत्य लढतीत केरळ संघाशी महाराष्ट्र झुंजणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *