
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमीचा विद्यार्थी ओम रामगुडे याने चौदाव्या भारतबाई हलकुडे मेमोरियल ओपन फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आणि सोळाव्या भारतबाई हलकुडे मेमोरियल ओपन ब्लिट्झ फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावत घवघवीत यश संपादन केले.
ओम रामगुडे याने फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्तम श्रेणी एमएच-पुणे मध्ये पहिले स्थान मिळवले. ओम याने सात हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि ट्रॉफी जिंकली. त्याने नऊ डावांत ६.५ गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली.
ब्लिट्झ फिडे रेटिंग स्पर्धेत ओम याने सर्वोत्तम वय श्रेणी अंडर १५ (ओपन) मध्ये नऊ डावांत सहा गुण मिळवले आणि ६०० रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. या शानदार कामगिरीबद्दल ओम याचे व्हिक्टोरियस चेस अकादमीतर्फे अभिनंदन करण्यात आले.