
छत्रपती संभाजीनगर ः शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण करून देणाऱ्या कांचनवाडी येथील सीएसएमएसएस छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची विद्यार्थीनी संस्कृती सतिश शेळके हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी जाहीर केल्यानुसार हिवाळी २०२३ विद्यापीठ परीक्षेत तृतीय वर्ष बीएएमएस परीक्षेत महाराष्ट्रातील १०७ महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच संस्कृती ही महाराष्ट्र राज्यातून पहिली आली आहे.
यापूर्वी संस्कृती शेळके ही प्रथम वर्ष बीएएमएस उन्हाळी २०२१ परीक्षेत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. गंगापूर येथील सतीश श्रीरंग शेळके यांची कन्या संस्कृती शेळके ही दहावीच्या परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय वैद्यकीय शिक्षण घेऊन महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, नाशिकमार्फत घेण्यात आलेल्या बीएएमएस तृतीय वर्षाच्या परीक्षेत १०५० पैकी ८३१ गुण मिळवून तिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला.
संस्कृतीचे वडील सतीश श्रीरंग शेळके संगणक दुरुस्तीचे काम करतात, तर आई शीला शेळके या शिलाईचे काम करतात. प्रतिकूल परिस्थिती असताना संस्कृतीने हे यश मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, सदस्य, प्राचार्य डॉ श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ जयश्री देशमुख तसेच अध्यापक व कर्मचारी यांनी संस्कृतीचे अभिनंदन केले आहे.
संस्कृती सतीश शेळकेचा सत्कार संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांच्या हस्ते करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकांत देशमुख, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ शशिकांत डिकले, एचआर विभागाचे अनिल तायडे तसेच जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते.
नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली – संस्कृती शेळके
सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये महाराष्ट्रातून मला सर्वाधिक सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याचे सर्व श्रेय माझे आई, वडील व सीएसएमएसएस आयुर्वेद महाविद्यालयाला देईन. कारण आज मी जे काही यश मिळवलं ते यांच्यामुळे. डॉ श्रीकांत देशमुख सर आणि टीम यांनी जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती, खरे तर हेच माझे प्रेरणास्थान होते. त्याच्याकडून मी या गोष्टी शिकले. कोणती ही गोष्ट म्हणजे अकॅडेमिक, स्पोर्ट्स व योगा यामध्ये सर्वानी आम्हाला खूप मेहनत, सर्व तसेच मदत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे अशी भावना संस्कृती सतीश शेळके हिने व्यक्त केली आहे.